पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेचे अंतर्गत कामकाज कसे चालते? याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शैक्षणिक ‘प्रति विधानसभेचे’ आयोजन केले होते. या उपक्रमातून विधानसभेप्रमाणेच राजकीय व सामाजिक वातावरण निर्मिती झाली होती. आपल्या विचारांचे सादरीकरण करताना व मुद्द्ये पटवून देताना मुरलेल्या राजकीय नेत्याला शोभेल अशी संवाद कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होती तसेच या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह दिसत होता आणि एकंदरीत स्वेरीमध्ये विधानसभेतील चर्चासत्र सुरू आहे की काय असे वाटत होते.
सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे, विधानसभेचे कामकाज कशा प्रकारे चालते ? हे विद्यार्थ्यांना समजावे म्हणून स्वेरीचे संस्थापक सचिव आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ.एस. बी. भोसले यांच्या नेतृत्वाखाली व प्रा.एस.एन. मोरे यांच्या सहकार्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (मेसा) अंतर्गत भव्य 'प्रति (मॉक) विधानसभे' चे आयोजन केले होते. अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची भूमिका साकारताना स्वेरी मधील विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर मुखवटा, वेशभूषा, संवाद फेक, वातावरण निर्मिती यांसह परिपूर्ण राजकीय नेत्यांची भूमिका पार पाडली होती असे दिसून आले. स्पर्धा परीक्षेत राजकीय प्रश्न नक्कीच विचारले जातात हा धागा पकडून विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा भाग म्हणून ही 'प्रति विधानसभे' ची तयारी केली होती. या 'प्रति विधानसभे' मध्ये राज्यात गाजत असलेले संतोष देशमुख हत्या प्रकरण, बेरोजगारी, वाढते भ्रष्टाचार, युवकांची बेरोजगारी, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न, शेतकरी आत्महत्या प्रश्न, आर्थिक व्यवस्था, विकास कामे, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, वाहतूक नियंत्रण अशा विविध विषयांवर राजकीय भाष्य करताना राजकीय नेत्यांमधील समतोल राखला गेला.
या प्रति संसदेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील आदित्य भूसनर यांनी सभागृह अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची हुबेहूब भूमिका साकारली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दिग्विजय बुर्रा यांनी साकारली. त्याचप्रमाणे प्रतीक येडवे, वीरसिंह भोसले, स्वप्निल आटकळे, हर्षद जाधव, रोहन जाधव, वैभव थिटे, सुयश इंगोले, महेश गांजले, सुरज गेले, मकरंद कर्चे, गोविंद भंडारे, सुमित सतुते, प्रणव पवार, लक्ष्मण पंदे, समर्थ पवार, स्वप्निल भोसले, अथर्व बोचरे, सुयश मागाडे, निखिल जाधव, निनाद काळे, चेतन गरांडे, रमेश कोळी, संग्राम डोके, अजय साळुंखे, अनिरुद्ध साबळे, आशुतोष जाधव, आदित्य जाधव, आदित्य स्वामी, समर्थ पवार, गौरी सराटे, साक्षी सर्वगोड, प्रतिक्षा चौधरी, मानसी कंदी, स्वराली नकाते, प्रतिक्षा राऊत, मयुरी चव्हाण, दिव्या डोंगरे, सोनाली कांबळे, पायल पुरी, ज्ञानेश्वरी मिटकरी, शुभांगी सगर, राधिका जाधव, अस्मिता शेळके, नुपूर आचलारे या विद्यार्थ्यांनी विविध राजकीय नेत्यांच्या भूमिका अगदी हुबेहूब साकारल्या.
हे पाहताना विधानसभेचे कामकाज अगदी जवळून पाहतोय असा भास होत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी गोफने व प्रताप लवळे यांनी केले तर देवेश खरे यांनी आभार मानले.