सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आडके हॉस्पिटल, आडके फाउंडेशन, सोलापूर व आसामी- इंडियन यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय इलिझारोवह फेलोशिप या कार्यशाळेचा शुभारंभ हॉटेल प्रथम ,सोलापूर येथे झाला.
कार्यशाळेचे उद्घाटन सोलापूरचे जगप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. कांतीलाल डागा यांच्या हस्ते व रेवरंट फादर विकास रणसिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
एलिझारो्ह हे एक अतिशय प्रगत रशियन अस्थिरोगांवरील तंत्रज्ञान असून अस्थिरोगांवरील ८० टक्के व्याधींवर यामुळे अतिशय अचूक , प्रभावशाली व खात्रीलायक रित्या , विना चिरफाड उपचार करता येतात.या सात दिवसीय कार्यशाळेमध्ये आडके हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग व इलिझारोव्ह तज्ञ डॉ. संदीप आडके हे जगभरातील अस्थिरोग तज्ञांना या तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण देणार आहेत .
या कार्यशाळेचे हे दहावे वर्ष असून जगातील सात दिवसांमध्ये फेलोशिप देण्याचा हा पहिलाच अत्यंत यशस्वी प्रयोग डॉ. संदीप आडके व त्यांच्या आडके हॉस्पिटल ने केलेला आहे.
या कार्यशाळेसाठी भारतातील कानाकोपऱ्यातून तसेच श्रीलंका, कॅमेरुन, बुगांडी, इथिओपिया, सुदान अशा अनेक आफ्रिकन देशातून अस्थिरोग तज्ञांनी शिकण्यासाठी नोंद केलेली आहे. आज सोलापुरात विमानसेवा नसताना सुद्धा जगभरातून हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी अस्थिरोग तज्ञ सोलापुरात येतात ही सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
ही कार्यशाळा संपन्न करण्यासाठी डॉ.डायना आडके व आडके हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेले आहेत.