पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पोस्टर प्रेझेंटेशनचे उदघाटन
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘कोणतीही स्पर्धा असो त्यात विजयी होणे हा जरी आपला उद्देश असला तरी त्यातून पराभव झाल्यास खिलाडीवृत्तीने तो पराभव स्विकारता आला पाहिजे. आपण स्पर्धेत सहभागी झालात हाच एक विजय आहे. स्पर्धेतून आपली गुणवत्ता समजते. आपल्यातील स्टेज डेअरिंग वाढीस लागते आणि जागतिक दर्जाच्या स्पर्धेची जणू तयारी होत असते. एकूणच आपण मर्यादेबाहेर जावून सादरीकरण केल्यास त्याचे फळ लवकर दिसून येते. यासाठी बक्षीस मिळाल्यावर हुरळून न जाता आणखी मोठ्या स्पर्धेत कसे सहभागी होता येईल आणि त्यात कसे विजयी व्हायचे याची आखणी केली पाहिजे. पेपर प्रेझेंटेशन सारख्या स्पर्धेमुळे ‘टिम वर्क’ च्या माध्यमातून अधिक शिक्षण मिळते. म्हणून विजयापेक्षा स्पर्धेत सहभाग घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या सहकार्याने पीएम- उषा या योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२४’ मधील पोस्टर प्रेझेंटेशन च्या उदघाटन प्रसंगी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी राजीव गांधी सायन्स अँड टेक्नोलॉजी कमिशनचे सदस्य सचिव डॉ. नरेंद्र शाह यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय वातानुकुलीत भव्य सभागृहात ‘पेपर प्रेझेंटेशन’ स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये अभियांत्रिकी, फार्मसी च्या पदवी, पदविकेमधील व एम.बी.ए., एम.सी.ए. व पीएच.डी. या पदव्युत्तर पदवी मधील संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी शोध पोस्टर चे सादरीकरण केले. त्यात सर्व मिळून जवळपास ५०० हून अधिक संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला तर ऑनलाईन पद्धतीने १०० जणांनी पेपर सादरीकरण केले. यात ट्रेनींग प्लेसमेंट विभाग व सिव्हील विभागात पाच हॉल मध्ये व डिप्लोमाच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या भव्य हॉल मध्ये याचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाच्या विषयातून कल्पकता, नवनिर्मिती याची चुणूक परीक्षकांना दिसून आली. अटेंडन्स सिस्टीम, एको फ्रेंडली, ६० डिग्री पार्किंग सिस्टीम, हॉस्पिटल वेबसाईट, ड्रोन च्या साह्याने शेती फवारणी, पीआय सेन्सर च्या माध्यमातून भूकंपात दबलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, जीपीआर रडार अशा अनेक विषयावर विद्यार्थी प्राध्यापकांनी सादरीकरण केले.या पोस्टर प्रेझेंटेशन उपक्रमाचे समन्वयक म्हणून डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्रा. सागर सपकाळ व फार्मसीचे प्रा. कौलगी यांनी काम पाहिले. यावेळी उद्योजक सुरज डोके, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, बी.फार्मसीचे डॉ. एम.जी. मनियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस. व्ही. मांडवे, ‘टेक्नो-सोसायटल २०२४’ चे समन्वयक डॉ. अमरजित केने, प्रा. पूजा रोंगे व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. ‘टेक्नो-सोसायटल २०२४’ या आंतर राष्ट्रीय परिषदेचा आज (शनिवार) शेवटचा दिवस असून यासाठी स्वेरीचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या शोध पोस्टरचे सादरीकरण हे वाखाणण्याजोगे आहे. विशेषतः दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे डिप्लोमा मधून शिक्षण सुरु असताना त्यांच्या कार्यातून उत्तम प्रकारे कल्पकता आढळते. स्वतः कठोर परिश्रम घेवून, अभ्यास करून सादर करणे हे अत्यंत अवघड कार्य असते. हे कार्य स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी तन्मयतेने केल्याचे दिसून येते.
-डॉ. रामदास बिरादार, परीक्षक, ‘टेक्नो-सोसायटल २०२४’

