कुर्ला प्रतिनिधी तेज न्यूज
मुंबईतील कुर्ला परिसरात भीषण अपघाताची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव बेस्टच्या बसने अनेकांना धडक दिली आहे. या अपघातामध्ये १७ जण जखमी झाले असून ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ही अपघाताची घटना घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर लगेच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बेस्टच्या बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईतील कुर्ला परिसरातील एलबीएस रोड या ठिकाणी ही घटना घडली आहे. या परिसरामधून ही बस जात असताना बस चालकाने भरधाव बस चालवल्याने अनेकांना धडक बसली. या अपघातात जवळपास १७ जण जखमी झाले आहेत. तसेच ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या अपघातात काही गाड्यांचा देखील चक्काचूर झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंत अवस्थेत असल्याचा आरोप देखील आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला असून पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. मात्र, या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.