मुंबई साठी १,९१७ व गोव्यासाठी १,५२३ रुपयांमध्ये फ्लाय ९१ कंपनीची विमानसेवा
सोलापूर विचार मंचाच्या डॉ. संदीप आडके यांना कंपनीद्वारे आमंत्रण
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
येत्या २३ डिसेंबर पासून सोलापुरातून मुंबई व गोव्यासाठी फ्लाय ९१ या गोवा येथील कंपनीची विमानसेवा सुरू करण्याबाबत १५ नोव्हेंबर रोजी कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून अधिकृत घोषणा व विमानांचे वेळापत्रक जाहीर केलेले होते.अशी माहिती डॉ संदीप आडके यांनी दिली आहे.
कंपनीने नुकतेच सोलापूर ते गोवा रुपये १,५२३ व सोलापूर ते मुंबई रुपये १,९१७ असे दर पत्रक सुद्धा कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले आहे.
अशी असेल विमानसेवा:
गोवा - सोलापूर
स. ८.००-०९.१०
सोलापूर -मुंबई
स.०९.४०-११.२०
मुंबई -सोलापूर
स.११.५५-१३.४५
सोलापूर -गोवा
दु.१४.१५-१५.३०
ही विमानसेवा फ्लाय ९१ कंपनीच्या एटीआर ७२-६०० प्रकारातील विमानाद्वारे देण्यात येणार आहे.
व्हायेबिलिटी गॅप फंडिंग या योजनेमध्ये सुरुवातीला ही विमानसेवा देण्यात येईल व पुढे 'उडान' योजनेअंतर्गत सुरू ठेवली जाईल.
सोलापूर विचार मंच तर्फे गेल्या साडेचार वर्षात होटगी रोड विमानतळा मधील प्रमुख अडथळा ठरलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अनाधिकृत चिमणी पाडण्यासाठी व या विमानतळाचे नूतनीकरण करून कार्यान्वित करण्याबाबत सर्व न्यायालयीन व प्रशासकीय पाठपुरावा करण्यात आलेला आहे . लवकरच सोलापुरातून बेंगलोर ,हैदराबाद, नवी दिल्ली ,अहमदाबाद ,चेन्नई व तिरुपती या ठिकाणी सुद्धा विमानसेवा सुरू करावी असे प्रस्ताव जून २०२३ पासून सातत्याने देण्यात येत आहेत.सोलापूर विचार मंचच्या डॉ. संदीप आडके यांनी फ्लाय ९१ कंपनीचे सीईओ व एमडी मनोज चाको यांच्याशी गेल्या दोन महिन्यात सातत्याने पाठपुरावा करून व सोलापूरच्या बाबतीत चांगले ब्रॅण्डिंग करून ही विमानसेवा सुरू करण्यात यश प्राप्त केले आहे. प्लाय ९१ कंपनीतर्फे डॉ. संदीप आडके यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. याबाबतचा मेल त्यांना प्राप्त झाला आहे.
यामुळेच सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा होईल व सोलापुरातील अनेक उद्योगधंद्यांना उभारी मिळून नवीन उद्योग व्यवसाय येथे येतील व सोलापूरचे विस्थापित लोक सोलापुरात येतील तसेच सोलापुरातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळून मोठ्या रोजगार संधी येथे उपलब्ध होणार आहेत व पुन्हा एकदा सोलापूर आंतरराष्ट्रीय पटलावर येईल.