श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पारंपरिक अलंकाराच्या वेशातील मनमोहक रूप
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भाऊबीज निमित्त दुपारी पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंडपेठया जोड, हिऱ्यांचे कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरी, मोत्याची कंठी पाचूचा लोलक, मारवाडी पेठयांच्या मोत्यांचा हार, नेकलेस, शिरपेच मोठा दोन लोलक, शिरपेच लहान दहा लोलक, शिरपेच लहान, मत्स्य जोड, तोडे जोड, बाजीराव कंठी, तुळशीची माळ एक पदरी, मोहरांची माळ इ.
श्री रुक्मिणी मातेस जडावाचे मुकुट, जडावाचा हार, खड्यांची वेणी, पाचूची गरसोळी, चिंचपेटी हिरवी, हातसर जोड, तन्मणी मोठा, दशावतारी हार, तुळशीहार एक पदरी, जडावाचे ताणवड जोड, चंद्र, सूर्य, मोत्याचा कंठा, बाजीराव गरसोळी, पेठयाची बिंदी, खड्यांच्या पाटल्या जोड, मोत्याचा तुरा, मत्स्य जोड, मोठी नथ, कर्णफुले जोड, कंबरपट्टा, वाक्याजोड, तोडे जोड, तारामंडल इत्यादि अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत.
तसेच श्री.राधिका मातेस सोन्याचा मुकुट, पुतळ्यांची माळ, जवेची माळ, जवमनी पदक, ठुशी , हायकोल श्री.सत्यभामा मातेस सोन्याचा मुकुट, लक्ष्मीहार, चिंचपेटी तांबडी,जवेची माळ, मोहरांची माळ इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
दिवाळीसाठी प्रत्येकजण ठेवणीतले आणि नवीन कपड्यात सजत असतो अगदी तसेच लाडक्या विठूरायाला व रुक्मिणी मातेलाही दिवाळीसाठी अनमोल मौल्यवान दागिन्यात सजविण्यात येत असते, सर्व दागिने परिधान करण्यासाठी एक तासांचा अवधी लागत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.