परभणी प्रतिनिधी तेज न्यूज
परभणी जिल्ह्यातील मानवत जवळील यशवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात आज (शनिवार) एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली आहे. मंदिराच्या सभा मंडपाचे बांधकाम सुरू असताना अचानक पिलरसह छताचा काही भाग कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शनिवार असल्याने मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती, त्यामुळे अनेक भाविक दगवल्याची भीती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानवत तालुक्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरात शनिवार निमित्त दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. याच दरम्यान, मंदिर परिसरात सुरू असलेल्या सभा मंडपाच्या बांधकामाचा एक मोठा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. पिलर आणि छताचा राडारोडा थेट खाली उपस्थित असलेल्या भाविकांवर पडला. या दुर्घटनेत 8 ते 10 भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती_
या दुर्घटनेत काहींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, छताचा मोठा भाग कोसळल्यामुळे काही भाविक अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
बांधकाम सुरू असतानाच घडली दुर्घटना
यशवाडी येथील या हनुमान मंदिरात गेल्या काही दिवसांपासून सभा मंडपाचे बांधकाम सुरू होते. आज शनिवार असल्याने मजुरांचे काम आणि भाविकांची वर्दळ एकाच वेळी सुरू होती. मात्र, हे बांधकाम सुरू असतानाच अचानक पिलर आणि छताचा भाग कोसळल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


