सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने अचानक हरवलेल्या ९ वर्षीय मुलीचा अवघ्या दोन तासांत शोध घेऊन पंढरपूरला जाणाऱ्या एसटीमधून मुलीला परत सांगोला बसस्थानकावर पाठवले. दुपारी ३च्या सुमारास बसस्थानकावर एसटीतून खाली उतरताना मुलीला पाहून आईचा जीवात जीव आला. हा प्रकार सोमवारी दुपारी १२ वाजता सांगोला बसस्थानकावर घडल्यानंतर बसस्थानकावर एकच गोंधळ उडाला होता. सध्या दीपावली सणामुळे सांगोला बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे.
दरम्यान सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२च्या सुमारास तांबोळी कुटुंबीय इस्लामपूरला जाण्यासाठी सांगोला बसस्थानकावर एसटीची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी आईने मुलीला बसस्थानकावर थांबवून लघुशंकेसाठी गेली असता तिची ९ वर्षीय मुलगी प्रवाशांच्या गर्दीमुळे नातेवाईक एसटीत बसल्याचे समजन पंढरपरकडे जाणाऱ्या एसटीमध्ये बसली व एसटीने बसस्थानक सोडले त्यानंतर मुलींची आई परत बसस्थानकावर आली. तिला मुलगी दिसून न आल्यामुळे तिने माझी मुलगी कोठे गेली, असा शोध घेत टाहो फोडला.
यावेळी सांगोला स्थानक प्रमुख पंकज तोंडे व वाहतूक निरीक्षक सागर कदमसह इतर कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून आईकडून मुलीचे नाव व इतर माहिती घेतली. मुलगी पंढरपूर जाणाऱ्या एसटीमध्ये बसल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसताच कर्मचाऱ्यांनी क्षणाच विलंब न लावता पंढरपूरला जाणाऱ्या एसटी चालक-वाहकाशी संपर्क साधला असता चालकाने त्या मुलीस खर्डी, ता. पंढरपूर येथे एसटीतून खाली उतरून सांगोल्याकडे जाणाऱ्या सांगली आगाराच्या एसटीमध्ये बसवून पाठवून दिले.
दोन तास आपल्यापासून गायब झालेली मुलगी सांगोला बसस्थानकात उतरताच आईने तिला पाहताच तिच्या जीवात जीव तर आलाच तांबोळी कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास घेतला.