पंढरपूर प्रतिनिधी तेज न्युज
कार्तिकी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसर व दर्शन रांगेत मंदिर समितीच्या वतीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी विविध सेवाभावी संस्थांचे सुमारे 1200 स्वयंसेवक विना मोबदला 24 सेवा देत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
वर्षभरात माघी, चैत्री, आषाढी व कार्तिकी अशा चार प्रमुख यात्रा पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भरत असतात. या यात्रा कालावधीत मंदिर समितीकडे विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक विना मोबदला सेवा देत असतात. त्यामध्ये कार्तिकी वारीत स्वकाम सेवा, आळंदी यांच्याकडील स्वयंसेवक स्वच्छता, श्री संत गजानन महाराज मठ अकोला यांच्याकडील स्वयंसेवक दर्शन रांगेत चहा व खिचडी वाटप तसेच वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या मार्फत दर्शन रांगेत वैद्यकीय सेवा, विठ्ठल सेवा मंडळ पुणे यांच्याकडील स्वयंसेवक देणगी संकलन करण्याची सेवा देत आहेत.
तसेच गीताई सेवा मंडळ औसा यांच्याकडील महिला स्वयंसेविका मंदिर समितीच्या अन्नछत्रांमध्ये भोजन प्रसाद तयार करण्यासाठी मदत करीत आहेत. विश्व सामाजिक सेवा भावी संस्था आळंदी व श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आळंदी यांच्याकडील स्वयंसेवक दर्शन रांगेत स्वच्छता करणे, दर्शन रांग सुलभ चालविण्यासाठी मदत व दर्शन रांगेत पाणी वाटप करण्याची सेवा बजावत आहेत. संत मिराजी महाराज सेवेधारी मंडळ अकोला यांच्याकडील स्वयंसेवक पत्रा शेड येथे मागील वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्रांमध्ये भोजन प्रसाद तयार करून वाटप करण्याचे काम करत आहेत.
लौकिकापुरती नव्हे माझी सेवा ।
अनन्य केशवा दास तुझा ॥
या श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे, विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक सेवा देत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले. तसेच आठ सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक मंदिर समितीकडून कोणत्याही स्वरूपाचा मोबदला न घेता, सेवाभावी वृत्तीने विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अनेक वर्षापासून यात्रा कालावधीत सेवा देत आहेत. या सर्व स्वयंसेवकांना मंदिर समिती मार्फत निवास व भोजन व्यवस्था करण्यात आल्याचेही श्री.श्रोत्री यांनी सांगितले.