पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक डॉ. वृणाल मोरे, प्राचार्य डॉ. मिथुन मणियार आणि डॉ. प्राजक्ता खुळे यांनी फाईल केलेल्या ‘ॲपरॅटस फॉर मेजरींग स्प्रेडाबिलिटी ऑफ सेमी सॉलिड फॉर्मुलेशन’ या पेटंटला भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून मान्यता मिळाली आहे. या पेटंटच्या यशस्वीतेसाठी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे तसेच स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
फार्मसीचे क्षेत्र नेहमीच नवनवीन संशोधनांमध्ये अग्रेसर असते.त्याप्रमाणेच विविध औषधनिर्माण कंपन्या आणि महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता असते ही गरज लक्षात घेऊन स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. वृणाल मोरे यांनी त्यांच्या टीम सोबत ‘ॲपरॅटस फॉर मेजरींग स्प्रेडाबिलिटी ऑफ सेमी सॉलिड फॉर्मुलेशन’ हे आधुनिक उपकरण बनवले आहे. हे उपकरण सेमी सॉलिड डोसेज फॉर्म साठीच्या सरकारच्या फार्मा स्टॅंडर्ड च्या ‘स्प्रेडाबिलिटी टेस्ट’ या चाचणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. स्प्रेडेबिलिटी हे सेमी सॉलिड औषधांचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. स्प्रेडेबिलिटी चाचणी ही औषध किती सोयीस्कर रित्या पसरते ते दर्शविते. स्प्रेडेबिलिटी चाचणी ही क्रीम, ऑइंटमेंट, जेल यासारख्या सेमी सॉलिड डोसेज फॉर्म जे की त्वचेवर लावले जातात त्यासाठी महत्त्वाची आहे. त्वचेवर लावायच्या औषधाची परिणामकारकता ही पेशंटने अचूक डोस त्वचेवर समान पसरवण्यावर अवलंबून असते; यासाठी स्प्रेडेबिलिटी ही चाचणी करावी लागते. आतापर्यंत ही तपासणी मॅन्युअल पद्धतीने केली जात होती त्यासाठी बराच वेळ जात होता आणि मॅन्युअल पद्धतीने अचूक परिणामकता मिळत नव्हती. आता स्वेरी फार्मसीच्या प्राध्यापकांनी तयार केलेल्या ह्या उपकरणामुळे कमी वेळात आणि अगदी अचूकपणे ही चाचणी प्रक्रिया करता येणार आहे. फार्मसी क्षेत्रात वापरले जाणार्या बहुसंख्य सेमी सॉलिड औषधांची स्प्रेडेबिलिटी चाचणी या आधुनिक उपकरणाच्या सहाय्याने सहज आणि तंतोतंतपणे करता येणार आहे. स्वेरीच्या प्राध्यापकांनी तयार केलेल्या या मशीनची हाताळणी ही खूप सोयीस्कर आहे. हे उपकरण ‘सेन्ट्रीफ्युगल फोर्स’ या तत्त्वावर काम करते. चाचणीसाठीच्या औषधाचे सॅम्पल उपकरणांमध्ये असलेल्या डिस्कवर ठेवावे लागते. सँपलचे प्रमाण ह्या उपकरणांमध्ये निश्चित ठेवण्यात आलेले आहे. ०.५ ग्रॅम ते १ ग्रॅम सँपल घेवून नंतर ते डिस्कवर इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने एक विशिष्ट आर.पी.एम. ला ०.५ मिनिट ते १ मिनिट फिरवले जाते. औषधाचे सँपल किती त्वचेवर पसरले आहे हे या उपकरणांमध्ये डिझायनर द्वारे दर्शवली जाते; तर नंतर सॅम्पल ची स्प्रेडाबिलिटी ही प्लेटवर पसरले असलेल्या सॅम्पल वरून ठरवली जाते. स्वेरीच्या प्राध्यापकांनी हे उपकरण मॅन्युअल चुका टाळणे आणि स्प्रेबिलिटी ही चाचणी अधिक अचूक आणि सोपी करणे ही उद्दिष्टे विचारात घेऊन निर्माण केले आहे. स्वेरी प्राध्यापकांच्या संशोधनाने तयार झालेले हे उपकरण वापरण्यास सोपे, जलद परिणाम देणारे आणि सोपी संरचना असलेले आहे. एकूणच हे उपकरण फार्मसीच्या कंपन्यांमध्ये व फार्मसीच्या महाविद्यालयांमध्ये फायदेशीर ठरणार आहे, असे या पेटंटचे मुख्य संशोधक प्राध्यापक डॉ. वृणाल मोरे यांनी सांगितले.
‘भारत सरकारकडून मान्यता प्राप्त झालेले हे एक डिझाईन पेटंट आहे.’ अशी माहिती कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी दिली. भारत सरकारकडून या पेटंटचे प्रमाणपत्र मिळाले असून या पेटंट मध्ये प्राचार्य डॉ. मिथुन मणियार आणि डॉ. प्राजक्ता खुळे हे सहसंशोधक आहेत. या पेटंटवर डॉ. वृणाल मोरे आणि त्यांच्या टीमने बरेच दिवस मेहनत घेतल्यानंतर त्यांना हे यश मिळाले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी पेटंट मधील टीमचे अभिनंदन केले.