पंढरपूर प्रतिनिधी
शासनाच्या वतीने सर्व हॉस्पिटल आणि दवाखाने यांचा बायोमेडिकल कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी एखादी संस्था काम करत असते.सोलापूर जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटलचा बायोमेडिकल कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी सद्या नेमलेल्या एस एस सिस्टीम या कंपनीने या अगोदरच्या दराच्या तब्बल 4 पट दरवाढ केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय संघटना व हॉस्पिटल यांना विश्वासात न घेता ही अन्यायकारक व जाचक दरवाढ केलेली आहे असा आरोप करीत ही दरवाढ तात्काळ रद्द करावी अन्यथा महापालिकेने एस एस सिस्टीम या कंपनीबरोबर केलेल्या कराराची होळी करण्यात येईल असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा,पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरी असोसिएशन, होमिओपॅथिक असोसिएशन,डेंटल असोसिएशन यांनी दिला आहे.
सोलापूर महापालिकेने एस एस सिस्टीम नावाच्या कंपनीला सोलापूर जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटलचा बायोमेडिकल कचराविले वाट लावण्यासाठी 10 वर्षाकरिता ठेका दिलेला आहे .या कंपनीने सोलापूर महापालिकेला बिलावर सर्वात जास्त म्हणजे 24 टक्के रॉयल्टी दर महिना देण्याचे करारात मान्य केलेले आहे.यापूर्वी मेडिकल वेस्ट गोळा करण्यासाठी टेंडर घेतलेली बायो मेडिकल वेस्ट कंपनी 5 टक्के रॉयल्टी बिलावर देत होती. या नव्या एस एस सिस्टीम कंपनीला टेंडर देताना महापालिका प्रशासनाने एकतर्फी तसेच त्या कंपनीला आर्थिक फायदा होईल याची काळजी घेणारा निर्णय घेतला आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे ? असा आरोप करत सर्व डॉक्टर संघटनांनी त्याला विरोध करून हा करार रद्द करण्याची मागणी केली आहे मात्र महापालिका प्रशासन या चुकीच्या निर्णयाचे समर्थन करत आहे असाही आरोप सर्व वैद्यकीय संघटनांनी केलेला आहे.
एस एस सिस्टीम या कंपनी द्वारे सर्व क्लिनिक हॉस्पिटल यांना नव्याने नोंदणी शुल्क विनापरतावा किमान 3 हजार ते 15 हजार रुपये घेण्याचे तसेच ट्रान्सपोर्ट चार्जेस च्या नावाखाली नव्याने प्रथमच 500 ते 5 हजार रुपये पर्यंत घेण्याचे व कचरा विल्हेवाट लावण्यासाठी प्रति बेड व प्रति दिवस नऊ रुपये दराने आकारणी करण्यात येणार असल्याचे दिसत आहे.
वास्तविक पाहता आरोग्य सेवा ही मूलभूत सुविधा आहे.हॉस्पिटल किंवा राहते घर येथून कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावणे ही मूलभूत सेवा मोफत किंवा माफक दरात देणे स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक असताना आणि डॉक्टर व हॉस्पिटल व्यावसायिक कर भरत असताना संबंधित कंपनीच्या अधिक रॉयल्टीमुळे हॉस्पिटलचा कचरा विल्हेवाट लावण्याचा दरामध्ये सर्वच पातळीवरती साडेतीन ते चार पट वाढ करण्यात आलेली आहे.
शासन एकीकडे सर्वच रुग्णांना मोफत किंवा अल्प दरात सेवा देण्यासाठी प्रयत्न करत असताना या वाढलेल्या अनावश्यक बोजामुळे सर्वसामान्य रुग्णांना कमी दरात सेवा देणे वैद्यकीय क्षेत्राला कठीण जाणार आहे.त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेने एस एस सिस्टीम या कंपनीने केलेली दरवाढ रद्द करून पूर्वीप्रमाणे आहेत तेवढेच दर आकारावेत अन्यथा पूर्वीच्या कंपनीलाच सेवा देण्यासाठी पत्र द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे .
एस एस सिस्टीम या कंपनीने आकारलेले बायोमेडिकल वेस्ट उचलण्याचे दर हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त दर आहेत असे दिसत असून महापालिका अधिकारी हे एस एस कंपनीवर एवढे मेहरबान का आहेत याची विभागीय आयुक्तालयातून चौकशी करण्याची गरज असल्याचं बोलले जात आहे.
या कंपनीकडून जे ई टेंडर भरलेले आहे त्यामधील कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी आहेत.यात काही शंकास्पद बाबी असल्याची चर्चा आहे त्यामुळे यात लक्ष घालून हा प्रश्न तातडीने सोडवावा अशा मागणीचे निवेदन इंडियन मेडिकल असोसिएशन,निमा,डेंटल असोसिएशन,होमिओपॅथिक असोसिएशन पॅथॉलॉजी लॅब असोसिएशन यांच्याकडून आरोग्य मंत्री तानाजी सावंत,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले आहे.
ही अन्यायकारक व जुलमी दरवाढ रद्द केली नाही तर सर्व असोसिएशन तर्फे या दरवाढी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कराराची होळी करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.
स्थानिक प्रशासनाच्यावतीने जर मेडिकल बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प राबवण्यात आला तर त्यासाठी सर्व मेडिकल असोसिएशन मदत करण्यास तयार असून विनाकारण होणारी ही दरवाढ रोखणे शक्य होणार आहे. यासाठी यापूर्वीच्या बायोमेडिकल वेस्ट गोळा करणाऱ्या कंपन्यांची मदत घेऊन कमीत कमी दरात सेवा देता येईल का हे तपासून पाहण्याची गरज आहे.