चिंचणी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सन 2023 - 24 अभियान राबविण्यात आले. यामध्ये जि.प.शाळा चिंचणी ता. पंढरपूर या शाळेची पुणे विभाग स्तरीय पुरस्कारा करीता तृतीय क्रमांकाची निवड करण्यात आली असुन या शाळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत 5 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वाजता टाटा सेंटर, मुंबई येथे गौरविण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 3800 शाळांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये चिंचणी शाळेने स्पर्धा निकषांमध्ये शंभर मार्कांचे गुणांकन मिळवत भौतिक सुविधा, शालेय व्यवस्थापन समितीचे योगदान, ग्रामस्थांचा सहभाग, विद्यार्थ्यांची गुणवत्ता व उपक्रमातील सहभाग, नावीन्यपूर्ण उपक्रम, पर्यावरण व राष्ट्रीय एकात्मता, साक्षरता, अशा वेगवेगळ्या निकषानुसार मार्क मिळवले आहेत. या निकषांची तपासणी करणेसाठी तालुका, जिल्हा, व विभाग स्तरीय कमिटीने पाहणी करून निवडी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्हास्तरीय चिंचणी शाळेचा प्रथम क्रमांक झाला असून यासाठी 11 लाख रुपये बक्षीस व पुणे विभाग स्तरावरील 7 लाख बक्षीस रक्कम मिळणार आहे.
मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेतून प्राधान्य क्रमानुसार शाळेच्या सुधारणेसाठी सदर रक्कम खर्च करण्यात येणार आहे. यापूर्वी कोरोना काळामध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये जिल्हास्तरावर राबविण्यात आलेल्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये या शाळेचा 1 क्रमांक आला होता. चिंचणी शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ यांनी सातत्याने शाळेच्या बाबतीत केलेल्या कामामुळे हे शक्य झालेले आहे. या अभियानासाठी चिंचणी ग्रामस्थांनी लोक वर्गणी मधून 5 लाखापेक्षा जास्त रक्कम जमा केली. चिंचणी ग्रामस्थांनी पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या गावाचे नाव राज्यभर करून संपूर्ण गाव स्वयंपुर्ण करण्याबरोबरच शाळेचाही नावलौकिक केला आहे.
यासाठी मुख्यध्यापिका ललिता मोरे, सहशिक्षक जालिंदर गायकवाड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत तसेच ग्रामस्थ व महिला यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. या शाळेला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे तसेच अनेक मान्यवर यांनी भेटी दिलेल्या आहेत. जिल्ह्याचा नावलौकिक करणाऱ्या जि.प.शाळा चिंचणी चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.