सुस्ते प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित,श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेस पंढरपूर पोलिस ठाणे अंतर्गत कार्यरत असणा-या निर्भया पथकाने भेट दिली.
पथकातील अविनाश रोडगे, विनोद काळे, विद्या पवार या पोलिस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गुड टच-बॅड टच, स्वसंरक्षण,मोबाईल वापराचे दुष्परिणाम, व्यसन, रस्त्यावर वाहने चालवताना घ्यावी लागणारी काळजी व कायदेविषयक प्रबोधन व मार्गदर्शन केले.मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची निर्मिती झालेली असून कोणीही छेडछाड करीत असल्यास,असुरक्षित वाटत असल्यास न घाबरता विद्यार्थ्यांनी आपले पालक,शिक्षक व पोलीस प्रशासनास कळवावे असे आवाहन निर्भया पथकाच्या वतीने करण्यात आले.पोलिस काका व पोलिस दिदी सदैव तुमच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असल्याचे सांगितले.
पथकातील सदस्यांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे,पर्यवेक्षक रणजित शिनगारे व प्रतिभा जावीर यांचे हस्ते करण्यात आला.तसेच सोलापूर येथे निवासी स्काऊट गाईड प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेबद्दल प्रशालेतील क्रीडा शिक्षक गणेश पाटील यांचाही सन्मान प्राचार्य पिसे यांनी केला. विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड याबद्दलची विस्तृत माहिती पाटील यांनी देऊन मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक राजेंद्र जाधव यांनी केले.सुत्रसंचालन प्रथमेश गावडे यांनी केले तर आभार श्रीकांत चंदनशिवे यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.