सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल पिकनिक पॉईंट, पाकणी येथे जाऊन आली. शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा शिक्षकांसह १८३ विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते. उंट सवारी, बैलगाडी, जम्पिंग, पाण्यातील होडी, झोका, घसरगुंडी, रस्सीखेच,रेन डान्स, झोपाळा, बॅट बॉल इत्यादी खेळांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांना मनसोक्त शेतात फिरता आले. शेत,शिवार, शेतकरी,बैल, बैलगाडी, पिके, शेततळे आदी विद्यार्थ्यांनी पाहिले व अनुभवले.शहरी जीवन व ग्रामीण भागातील लोकांचे जीवन यातील फरक विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.जेवणातील विविध खाद्यपदार्थांची ओळख करुन देण्यात आले.
सोलापूरातील अंबादास कनकट्टी यांनी चार्लीन चॅप्लिन च्या पोशाखात विविध हावभाव व नक्कल करुन विद्यार्थ्यांना खूप हसविले. कुत्रा , पिल्ले, डुक्कर, मांजर,सिंह आदी प्राण्यांचा, कावळा ,कोंबड्या, मोर,खंड्या,पोपट अशा अनेक पक्षांचे आवाज, बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज,गाड्यांचे आवाज, विविध व्यक्तींचे हुबेहूब आवाज काढून तसेच विविध सिनेमातील गाणी गाऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी आवडत्या गाण्यांवर नृत्य केले. अशाप्रकारे एक दिवसाची सहल आनंदात उत्साहात पार पडली. सहल यशस्वी होण्यासाठी प्रशांत बत्तूल, जगदेव गवसने, राजशेखर पाटील, सुनिता पवार, जगदेव रोडगे, कल्पना अक्कलवाडी, दिपाली कोरे, शोभा लिंबोळे, सुनंदा गुंडे आदींनी परिश्रम घेतले.