🟣 नियोजन समिती व स्वागत समिती अध्यक्षपदी भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांची निवड
🟢 विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींना मेळाव्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार
अकलूज प्रतिनिधी
सर्वच जाती धर्मातील वधू-वरांसाठी राज्यभर भरीव कार्य करीत असलेल्या कामशेत लोणावळा येथील
"माय रमाई फाउंडेशन" चा सोलापूर जिल्हा मेळावा मार्च 2024 मध्ये पहिल्या पंधरवड्यात पंढरपूर येथे होणार आहे.अशी घोषणा संस्थापक अध्यक्ष डॉ. अमर चौरे यांनी अकलूज येथे केली. श्रीनाथ डिजिटल अकलूज येथे भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींना पंढरपूर येथे आयोजित केलेल्या सर्व धर्मीय वधू वर परिचय मेळाव्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
'वय वर्षे 20 ते 55 वयोगटातील सर्व जाती आणि धर्मातील विदुर, विधवा, अनाथ, निराधार, परित्यक्ता, अपंग यांच्यासाठी विवाह जुळविणे आणि ते लावून देणे, विवाह संबंध अबाधित राहण्याच्या दृष्टीने योग्य तो समन्वय साधने या ध्येयाने प्रेरित होऊन अनेक वर्षांपासून माय रमाई फाउंडेशन यशस्वीपणे सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. आत्तापर्यंत या फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे 300 विवाह यशस्वी झाले आहेत आणि आणि त्या सर्वांची कौटुंबिक वाटचाल सुरळीत सुरू आहे हे या माय रमाई फाउंडेशनचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे'. असे मत नियोजन समिती व स्वागत समिती अध्यक्षपदी निवड झालेले भाग्यवंत नायकुडे यांनी व्यक्त केले.
यावेळी युवराज काशिनाथ वाळके यांची फाउंडेशनच्या अकलूज शहर अध्यक्षपदी तर निखिल हनुमंत गायकवाड यांची सचिव पदी निवड करण्यात आली. प्रारंभी नियोजन समिती सदस्य एड. अविनाश टी. काले यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. यावेळी महादू भालेराव, नियोजन समिती सदस्य तुकाराम साळुंखे पाटील, आकाश कैलास पाटसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आभार धनंजय सैंब यांनी मानले.
अकलूज येथील नियोजन समितीची बैठक होऊन पंढरपूर येथे मीटिंग घेण्यात आली त्यामध्ये जिल्हाध्यक्ष कुंडलिक राजाराम किर्ते, जिल्हा सरचिटणीस कविता मच्छिंद्र जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.