जशास तसे उत्तर देऊ - विश्वास मोहिते
कराड प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील पत्रकार गणेश लोंढे यांना झालेले मारहाण आणि जीवे मारण्याची धमकीच्या निषेधार्थ कराड येथील पत्रकार आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील पत्रकार गणेश लोंढे या पत्रकारांनी तक्रार झालेल्या व्यावसायिकाच्या संदर्भात, त्या व्यवसायिकाची प्रतिक्रिया घेण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधला, यावेळी दूरध्वनीवरून प्रतिक्रिया देण्यास नकार देऊन प्रत्यक्ष भेटण्यास सांगण्यात आले. या फोनवरील संभाषणानंतर पत्रकार गणेश लोंढे हे संबंधितांना भेटण्यास गेल्यानंतर गणेश लोंढे यांना ढकलून देऊन धक्काबुक्की करण्यात आली तसेच त्यांचा जवळपास 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता त्या व्यवसायिकाने उद्या बातमी छापलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशा पद्धतीची धमकी दिली. या धमकीच्या निषेधार्थ कराड येथील पत्रकारांच्या आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कराडचे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेचे अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी बोलताना भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेचे अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले, पत्रकारांना मारहाण म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे. वारंवार पत्रकारांना धमकी देणे हल्ला करणे अशा घटना घडत असल्यामुळे पत्रकारांनी संघटित राहून संघटित लढा देण्याची गरज आहे. आणि प्रशासनाने ही पत्रकारांवरती हल्ला करणाऱ्या लोकांवरती योग्य ती कारवाई करावी, आणि कायद्याचा धाक दाखवावा. म्हणजे यापुढे अशा घटना घडणार नाहीत असे सांगून विश्वास मोहिते म्हणाले, झालेल्या घटना निंदनीय असून यापुढे पत्रकार जशास तसे उत्तर देण्यास तयार असल्याचेही नमूद केले आहे.
यावेळी पत्रकार प्रमोद तोडकर, शरद गाडे, एस के मामा, संतोष वायदंडे, गणेश पवार,सुहास कांबळे, अक्षय मस्के भीम आर्मी सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा निरीक्षक अशोक मस्के, भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संपतराव मोहिते, पाडळी केसे ग्रामपंचायतचे सदस्य आनंदा बडेकर, सांगली जिल्हा उपाध्यक्ष दिलीप महाजन, कडेगाव येथील पत्रकार संपत जाधव सह पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.