अकलूज प्रतिनिधी
बुधवारी १ नोव्हेंबरला सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन होते . पहाटे पाच वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते साखर पोत्याचे पूजन झाल्यानंतर ही साखर शंभू महादेवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी कारखान्याचे चेअरमन आ रणजितसिंह मोहिते पाटील हे कारखान्याचे संचालक व कार्यकर्त्यासह पायी शिखर शिंगणापूरकडे निघाले होते .
या पायी यात्रेचे चित्रीकरण करण्यासाठी अकलूजचे फोटोग्राफर मिलींद गायकवाड आपल्या टीमसह तेथे आले व त्यांनी चित्रीकरण सुरु केले . ते चित्रीकरण ड्रोन कॅमेराद्वारे करीत होते . ते चित्रीकरण करीत करीत पालखी मार्गावर आले . तेथे उड्डाणपूलाचे काम सुरु होते . हे चित्रीकरण सुरु असतानाच ड्रोन कॅमेराचा संपर्क तुटला व ते भरकटले . त्यावेळी उपस्थितांनी त्या परिसरात त्याचा शोध घेतला परंतु ते मिळाले नाही . शिंगणापूर येथे सर्वानी मिलींदला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला सांगितले . मिलींदने आपल्या फोटोग्राफरच्या वॉटसप ग्रूपवरही ड्रोन हरविल्याचे टाकले .
काल माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी येथील कोळेकर यांच्या शेतात नवनाथ कोळेकर या २२ वर्षाच्या तरुणाला हा ड्रोन सापडला . बारावी शिकलेल्या या तरुणाने त्याच्या ओळखीच्या फोटोग्राफरला हे सांगितले . त्याने मिलींद गायकवाडला सांगितले व आज मिलींद गायकवाड याने भांबुर्डी येथे जावून त्यांची भेट घेतली. आज कुणाला एक रुपया जरी सापडला तरी कोणी परत देत नाही . आज दोन लाख रुपये किमतीचा ड्रोन या तरुणाने मिलींदला कोणतीही अपेक्षा न ठेवता परत केला . मिलींदने त्याचा सत्कार केला व त्यांच्याकडून ड्रोन घेतला . मिलींदच्या डोळ्यात अश्रू दाटले . त्याने नवनाथ , त्याची आई श्रीमती जिजाबाई कोळेकर व भाऊ आबा कोळेकर यांचे मनापासून आभार मानले . कोळेकर या शेतकरी कुटूंबातील व्यक्तीची परिस्थिती जरी गरीब असली तरी त्यांच्याकडील माणुसकी आजही जिवंत असल्याचे दिसून आले .