पंढरपूर प्रतिनिधी
चिंचणी ग्रामीण पर्यटन केंद्रला यापूर्वी 'क' वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे. या पर्यटन केंद्राचा विकास करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2023- 24 अंतर्गत चार कोटी च्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी विशेष मदत केली असल्याचे आ. बबनदादा शिंदे यांनी सांगितले.
या चार कोटी निधीमधून चिंचणी येथे होणाऱ्या शासकीय प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्र बांधकाम करणे, पर्यटकांसाठी टेन्ट व विश्रामगृह बांधकाम करणे, सुशोभीकरण व बगीचा तयार करणे, विद्युतीकरण करणे, रस्ता काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉक बसवणे, घाट बांधणे इत्यादी सुविधा करण्यात येणार आहेत. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची सोय होणार आहे.
चिंचणी या पर्यटन केंद्राला भेट देण्यासाठी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून निसर्गप्रेमी, पर्यटक येत असतात या ठिकाणी हुरडा पार्टी, आंबा रस, पुरणपोळी, दही धपाटे, पाटवडी रस्सा, चुलीवरचे जेवण इत्यादी ग्रामीण खाद्यपदार्थ व ग्रामीण जीवनशैली नैसर्गिक वातावरण यामुळे शहरी भागातील लोकांचे हे आवडते ठिकाण झालेले आहे. लोकसहभाग व लोकवर्गणीतून गेल्या वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या या ग्रामीण पर्यटन केंद्रा मधून गावाला चांगले उत्पन्न मिळाण्यास सुरवात झालेली आहे. हे पर्यटन केंद्र गावच्या सार्वजनिक मालकीचे असल्यामुळे गावातील लोकांना गावातच रोजगार निर्माण झाला असून या लोकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.
चिंचणी सारख्या छोट्याशा गावाने जिल्ह्यातील गावांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. सरपंच व ग्रामसेवक कार्यशाळा, पाणी फाउंडेशनच्या कार्यशाळा, खाजगी कंपन्यांच्या मिटिंग, गेटटुगेदर ,वाढदिवस या ठिकाणी होत असतात. यामुळे संपूर्ण वर्षभर या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. यापूर्वी जिल्हा नियोजन समिती, आमदार फंड, जन सुविधा,पंचवीस पंधरा, अशा वेगवेगळ्या योजनांमधून या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे आ.बबनदादा शिंदे यांनी सांगितले.
आम्ही चिंचणी चे लोक गेले वीस वर्षापासून सातत्याने स्वयंपूर्ण होण्यासाठी विकासाचे काम करत आहोत. या विकासाला मानवी चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न असून गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे.रोजगारासाठी गावातील लोकांचे स्थलांतर थांबले पाहिजे. गावामध्ये पर्यावरण पूरकव्यवसाय, कमीतकमी रासायनिक शेती,सेंद्रीय शेती इ.मधून संपूर्ण गावच पर्यटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा प्रयत्नांना आ.बबनदादा शिंदे यांची कायमच आम्हाला मदत राहिलेली आहे.
मोहन अनपट,चिंचणी.