सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी विशेष प्रयत्न करुन आणलेल्या सुमारे १ कोटी १५ लाख रुपयांच्या निधीमधून प्रभाग क्रमांक ६ मधील गडदर्शन सोसायटी शेजारी असलेल्या जाम मिल मधील आरक्षित असलेल्या ५० हजार स्केअर फूट जागेपैकी १० हजार स्क्वेअर फुट जागेत भव्य वारकरी भवन बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ शनिवार 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता संपन्न झाला . श्री श्री श्री १००८ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या अमृतहस्ते तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास आमदार विजयकुमार देशमुख, सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) , भागवत चवरे महाराज पंढरपूर , जोतीराम चांगभले तसेच शिवानंद पाटील , अमोल बापू शिंदे, संतोष पवार, किरण पवार, रेखा गायकवाड , लहू गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
सोलापूर प्रभाग क्रमांक ६ मधील दमाणी नगर भागातील जाम मिलमध्ये सोलापूर महानगरपालिकेची एकूण ५० हजार स्क्वेअर फुट जागा आरक्षित आहे . यातील १० हजार स्क्वेअर फूट जागेवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी विशेष प्रयत्न करुन सुमारे १ कोटी १५ लाख रुपये निधी वारकरी भवन बांधण्यासाठी मंजूर करून घेतला आहे . या वारकरी भवन विकासासाठी 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून देतो असे अमोल बापू शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
सुधाकर इंगळे महाराजांच्या अधिपत्याखाली दरवर्षी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर माघवारी पालखी रिंगण सोहळा पार पडतो. या सोहळ्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित असतात . अशाच एका रिंगण सोहळ्याप्रसंगी मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी सोलापुरात वारकरी भवन असावे , अशी इच्छा आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे जाहीर बोलून दाखवली होती. त्यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी हजारो वारकऱ्यांच्या समक्ष सोलापुरात वारकऱ्यांसाठी वारकरी भवन बांधून देण्याचा शब्द दिला होता आणि तो शब्द आमदार विजयकुमार देशमुख यांनी पूर्ण केला . त्यावेळी आमदार विजयकुमार देशमुख पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी नियोजन विभागातून निधी उपलब्ध केला होता . १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता टाळ मृदंगाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. या दिंडीत महिला पुरुष भाविक खुप उत्साही दिसत होते. दिंडी जागेवर आल्या नंतर वारकरी भवनाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले . या सोहळ्यासाठी सोलापूर शहरातील सर्व दिंडी प्रमुखाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती . हे भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष वारकरी भवनाच्या कामाचा श्री गणेशा होणार आहे. वारकरी भवन कसे असावे ? हायटेक प्रणाली, व्हाय फाय, ई. प्रगत तंत्रज्ञान वारकरी परंपरेसाठी उपयोगात आणले जाईल. या वारकरी भवनाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याबरोबरच वारकरी संप्रदायाला लागणाऱ्या सर्व गोष्टींचा विचार विनिमय करण्याबरोबरच वारकरी भवनच्या माध्यमातून हजारो वारकरी तयार करण्याचा मानस असल्याचे सुधाकर इंगळे महाराज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले . या वारकरी भवनामध्ये पंढरीच्या श्री विठ्ठलाची भव्य दिव्य आखीव आणि रेखीव मूर्ती बसविण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेची चर्चा केली असल्याचेही सुधाकर इंगळे महाराज यांनी सांगितले. वारकरी भवन ही वास्तू सोलापूर शहरात संप्रदायाला दिशा दर्शक ठरेल, संप्रदाय वाढीसाठी महत्त्व पूर्ण असेल असे मत गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.
वारकरी संप्रदाय हा मुळातच जातपात , वर्णभेद याच्या पलीकडे गेलेला आहे. त्या विचाराला सद्यस्थितीची जोड देण्यासाठी वारकरी भवन हे उपयुक्त ठरेल आणि तशी यंत्रणा असावी असे मत मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार ( शहर अध्यक्ष) यांनी केले व आभार नागनाथ पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने कारण्यात आली. सोलापूर जिल्हा व शहर परिसरातील वारकरी भाविक उपस्थित होते.