सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य मुख्यालय, मुंबई व सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच सोलापूर भारत स्काऊट गाईड शहर जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ सप्टेंबर पासून शिक्षकांसाठी प्रगत- ॲडव्हान्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
बाळे येथील ज. रा. चंडक प्रशालेत दि.२९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत सात दिवसांचे निवासी प्रशिक्षण होणार आहे. जिल्ह्यातील कब मास्टर,स्काऊट मास्टर, फ्लॉक लीडर व गाईड कॅप्टनचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आश्रम शाळा,इंग्लिश मिडियम स्कूल,जिल्हा परिषद शाळा व खासगी प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक -शिक्षिकांसाठी या प्रगत-ॲडव्हान्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा संघटक स्काऊट श्रीधर मोरे व संघटक गाईड अनुसया सिरसाट यांचे प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यात प्रथमच हे प्रशिक्षण होणार असून शहर जिल्ह्यातील स्काऊट गाईड शिक्षकांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा सेक्रेटरी तथा विस्तार अधिकारी गोदावरी राठोड यांनी केले. आपल्या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना राज्य पुरस्कार, राज्यपाल पुरस्कार, राष्ट्रपती प्रमाणपत्र पुरस्कार, पंतप्रधान ढाल स्पर्धा, चतुर्थ चरण व हिरक पंख राज्य पुरस्कार, राष्ट्रीय सुवर्ण बाण पुरस्कार नवी दिल्ली यासाठी शिक्षक- शिक्षिकांचे प्रगत प्रशिक्षण होणे आवश्यक आहे.सदर प्रशिक्षाणात जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले,जिल्हा आयुक्त तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, जिल्हा मुख्यालय आयुक्त तथा माजी शिक्षणाधिकारी विद्याधर जगताप,जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट तथा कॅम्प डायरेक्टर शंकरराव यादव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सोलापूरला प्रथमच संधी
आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील एच.डब्ल्यू.बी.-३०, एक.एल.टी.-२, एल.टी.- ०४ असे स्काऊट - गाईड मधील सर्वोच्च प्रशिक्षण घेतलेली प्रशिक्षीत शिक्षकांची संख्या आहे. राज्य प्रशिक्षण केंद्रावर दिली जाणारी प्रगत प्रशिक्षण ही सोलापूरला प्रथमच होत असल्याने हे आपल्यासाठी एक पर्वणीच आहे.या प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.सोलापूर जिल्ह्यासाठी प्रथमच संधी मिळाल्याने जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा संघटक श्रीधर मोरे यांनी केले आहे.