सोलापूर प्रतिनिधी
आई या दोन अक्षरांच्या शब्दात नभाइतके सामर्थ्य आहे. आईच्या ममतेपुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके पडते. सर्व दैवतात आई हे दैवत थोर आहे असे प्रतिपादन शिवानंद मेणसंगी यांनी केले.
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात आयोजित व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना मेणसंगी बोलत होते.'वात्सल्य सिंधू आई' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रविशंकर कुंभार होते.
मेणसंगी पुढे म्हणाले,आई म्हणजे ममता तसेच आ - म्हणजे आत्मा आणि ई - म्हणजे ईश्वर. या दोघांचा संगम म्हणजे आई होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय. एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलांवर भरपूर प्रेम करते. मूल म्हणजे आईसाठी सर्वस्व असते.
आईची महानता सांगताना मेणसंगी यांनी आई या शब्दास माता, माय, ममता, जन्मदा, जन्मदात्री, माउली, जननी, मातृ.आई माझा गुरू, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, माई, आई माझी,मा, मायाडी, माउली, आय अशी देवदेणगी शब्द आल्याचे सांगितले. अनेक उपमा देत विद्यार्थ्यांच्या हृदयस्पर्शी भावना व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, राजेंद्र मुलगे, प्रकाश कोरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरणा कलशेट्टी यांनी केले तर षडाक्षरी हिरेमठ यांनी आभार मानले.