तिर्थरुप अण्णा,
आज आपला जन्मदिन..!! बहुजन लेकरांचे शिक्षण उत्कृष्ठपणे व्हावे यासाठी आपण रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.. अठरा विश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाचा उध्दार शिक्षणाशिवाय होणार नाही हा म. जोतिबा, क्रांतीमाता सावित्रीमाई फुले व उस्मान आणि फातिमा शेख यांचा समाजउन्नतीचा कृतीशील विचार रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून छ. शिवबांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील वाड्यावस्तीवर, सह्याद्रीच्या कुशीत.. खेड्यापाड्यात अक्षरधनाच्या प्रयोगशाळा सुरू केल्या..!! आपल्या रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राला मजबूत करण्याचा विडा उचलला.. स्वावलंबी शिक्षणाचा संस्कार 'कमवा व शिका योजनेतून लाखो बहुजन समाजातील लेकरांच्या अंतःकरणात पेरला..या संस्कारातून घडलेली लेकरं भारताच्या व विशेषतः महाराष्ट्राच्या जडणघडणीत कायमच अग्रेसर आहेत. सत्यशोधक समाज अधिवेशनात आपण रयत स्थापनेचा विचार मांडताना छ. शिवाजी महाराजांच्या अंतःकरणातली रयत केंद्रस्थानी ठेवून रयत उभी केली व संस्था मजबूत करण्यासाठी उभी ह्यात घालवली.
जगा व जगू द्या' हा विचार जगून दाखविला.. आपल्या कार्यामुळे महाराष्ट्र शंभर वर्षे पुढे गेला.. अस्पृश्यांना आपण शिक्षणाची कवाडं खुली केली... रयत शिक्षण संस्थेमुळे गरीबांच्या घरात अक्षरधनाचे ऐश्वर्य आले.. झोपडपट्टीतील मुलं अलिशान गाड्यांतून फिरु लागली.. त्यांच्या बंगल्यांची उंची वाढली.. भाकरीला मोताद असलेल्या बहुजन समाजातील लेकरांच्या बँकेतील ठेवी वाढल्या.. सामान्य माणसाची पत व प्रतिष्ठा वाढली हा सगळा पराक्रम अण्णा तुम्हाला म्हणून करता आला.. छ. शाहू महाराजांच्या सान्निध्यात आपण महाराष्ट्र मोठा करण्याचा विडा उचलला.. अनेक खस्ता खाल्ल्या.. रयत माऊली लक्ष्मीबाईंनी बहुजन समाजातील लेकरांच्या शिक्षणासाठी मंगळसूत्रासह ८० तोळे सोने विकून रयतेचे कल्याण केले.. आज महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेचा विस्तार हे आपले माझ्या मते खरे जिवंत स्मारक आहे.
तिर्थरुप अण्णा तुमच्या उत्तुंग कार्यास सलाम आणि स्मृतीस विनम्र अभिवादन .