तालुक्यातील विकास पर्वाचे सोनेरी पान उघडत आहे : आम. शहाजीबापू पाटील
सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये व विकासाच्या पर्वामध्ये नोंद व्हावी असा हा दिवस : मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील
सांगोला प्रतिनिधी
सोमवार दि. ११सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्यातील नूतन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व महूद रोड वंदे मातरम चौक ते मिरज रेल्वे गेट काँक्रीट बायपास रस्त्याच्या एकूण २२ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले सांगोला शहराच्या विकासाच्या दृष्टीने तालुक्यातील विकासाच्या पर्वाचे एक सोनेरी पान आज उघडत आहे. आमदार होत असताना मी आणि दिपकआबा प्रत्येक स्टेजवर तालुक्यातील जनतेला एक अभिवचन देत होतो. एक संधी देऊन बघा तालुक्यातील विकासाचे गणित आम्ही दोघे बदलून टाकू. आणि त्या अभिवचनाची आज आम्ही दोघे मिळून पूर्ती करत आहोत. बाबुराव भाऊ गायकवाड व भाऊसाहेब रुपनर अशा ज्येष्ठ नेत्यांनी सातत्याने आम्हाला पाठबळ दिलं त्यामुळे आम्ही यशाकडे गेलो आम्ही कोठे थांबलो नाही लगेच कामाला लागलो. सांगोला शहराचा विचार केला तर प्रत्येक इमारत ही इंग्रजांनी बांधलेली आहे. रेस्ट हाऊस इंग्रजांनी बांधले, तहसील कार्यालय इंग्रजांनी बांधले प्रत्येक इमारत ही इंग्रज काळातील आहे. आणि त्यामुळे आधुनिकता आणि आधुनिक तंत्रज्ञान कार्यालयाला खऱ्या अर्थाने मिळायला पाहिजे होतं पण ते मिळत नाही. सांगोला शहर व तालुक्यातील जनतेला त्रास होऊ नये या उद्देशाने आज एकच इमारत व त्या इमारतीमध्ये सर्व शासकीय अधिकारी असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे एकाच इमारती मधून होणार आहेत.
या इमारतीमध्ये जनतेला बसण्यासाठी सुसज्ज असं वेटिंग हॉल तयार करण्यात येणार आहे. २०० नागरिक तिथे बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिकच्या समृद्धी मार्गात जे हेवी बजेट आहे ते बजेट या रस्त्यासाठी घेतलेल आहे. आरटीओ रिझर्वेशन च्या इमारतीसाठी ५ ते ६ कोटी रुपयांचे कार्यालय लवकरच मंजूर करून घेणार आहे. वकिलांना बसण्यासाठी ही लवकरच एक सुसज्ज इमारत उभी करणार आहे. सगळ्या सुविधा एका कॅम्पस मध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच क्रीडा संकुलासाठी ६० कोटी रुपये मंजूर होतील. हा सगळा परिसर सुसज्ज करू असे मत यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले तसेच या इमारतीचे काम योग्य पद्धतीने व लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या प्रशासकीय इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही असे अभिवाचन यावेळी त्यांनी दिले. सांगोला तालुक्यातील विकासाची सर्व कामे जनतेच्या आशीर्वादाने होत असल्याचे मत ही यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, सांगोला तालुक्याच्या विकासामध्ये आणि विकासाच्या पर्वामध्ये नोंद व्हावी असा हा दिवस आहे. तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय झाला. आणि आज आपण या इमारतीचा व रस्त्याचा शुभारंभ करत आहोत. वेगवेगळ्या ऑफिसमध्ये हेलपाटे मारून गेल्या ५० ते ६० वर्षांमध्ये तालुक्यातील जनता वैतागलेली आहे. एखादा अधिकारी ऑफिसमध्ये असतो नसतो परंतु या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व अधिकाऱ्यांवर वचक बसणार आहे व अधिकाऱ्यांना काळजीने या इमारतीमध्ये थांबावं लागणार आहे. व इकडे तिकडे विस्कळीत असणारी कार्यालये एकाच इमारतीमध्ये येणार आहेत. हा एक फायदा तालुक्यातील गरीब व गरजू जनतेला होणार आहे.
या ठिकाणी रस्त्याची फार मोठी अडचण होती. रेल्वेचे गेट पडल्यानंतर हजारो वाहने रस्त्याच्या बाजूने उभी केली जात होती. आता हा काँक्रीटचा रस्ता झाल्यावर तीही शहरातली फार मोठी सोय आपली होणार आहे. एक चांगले उद्योजक आणि ठेकेदार या कामासाठी आपल्याला मिळाले आहेत. त्यामुळे रस्त्याचे आणि प्रशासकीय इमारतीचे दर्जेदार काम होईल. सांगोला शहरांमध्ये व तालुक्यामध्ये विकासाच वातावरण निर्माण झालं आहे. जनतेच्या ज्या अपेक्षा लोकप्रतिनिधीकडून आहेत त्या अपेक्षा प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न मी व बापू करणार आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये कोणाला काय बोलायचं आहे ते बोलू द्या. परंतु सांगोला शहर व तालुक्यातील विकासाच्या बाबतीमध्ये बोलायचे शिल्लक ठेवणार नाही. असे मत यावेळी मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव (भाऊ) गायकवाड, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, शहराध्यक्ष तानाजी काका पाटील, उद्योजक महादेव गायकवाड, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, तहसीलदार किशोर बडवे, शिवसेना तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे, माजी नगराध्यक्ष रफिक भाई नदाफ, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, युवा सेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे, माजी नगरसेवक संजय देशमुख, माजी नगरसेवक सोमेश यावलकर, आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू तात्या सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुलगीर साहेब, ॲड. मुक्तार इनामदार, संतोष पाटील, समीर पाटील, इंजिनीयर जयदीप दिघे, बाबासाहेब बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पदाधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, नागरिक उपस्थित होते.