पंढरपूर प्रतिनिधी
अधिकमास दि.१८/०७/२०२३ ते दि.१६/०८/२०२३ या कालावधीत संपन्न होत आहे. या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यांना सकाळी ६.०० ते रात्री १२.०० या वेळेत दर्शनव्यवस्था, दर्शनरांग व्यवस्थापनेसाठी बरेकेटींग व पत्राशेडची निर्मिती, लाईव्ह दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रांती कक्ष, बाथरूम, दर्शनरांग द्रुतगतीने चालविण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती, आपत्कालिन व सुरक्षा व्यवस्था, देणगी व्यवस्था, निवास व्यवस्था, भाविकांची अपघात विमा पॉलीसी, स्वच्छता व्यवस्था, फोटो व्यवस्था, चौकशी कक्ष, वैद्यकीय सुविधा, वॉटर एटीएम, लाडूप्रसाद व्यवस्था, अन्नछत्र व्यवस्था, चहा व खिचडी वाटप, चप्पल स्टँड, चेंजिंग रूम व हिरकणी / विश्रांती कक्ष व इतर अनुषंगीक सोई सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
तसेच दर्शनरांगेत नियमन राखण्यासाठी ऑनलाईन दर्शन बुकींग, पाद्यपूजा, तुळशीपूजा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. दर्शनरांगेतील वाढती भाविकांची संख्या विचारात घेऊन, कायमस्वरूपी पत्राशेड येथे जादा दोन तात्पुरत्या पत्राशेडची निर्मिती करण्यात आली आहे. पत्राशेड येथे कुलरची व्यवस्था, पत्राशेड व बाजीराव पडसाळी येथे वैद्यकीय स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. दर्शनरांगेत मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. 108 क्रमांकाची व मंदिर समितीची रुग्णवाहिका तसेच पोलिस व मंदिर सुरक्षा कर्मचारी नेमणूक व सर्व रांगेत पर्यवेक्षण साठी मंदिर अधिकारी व कर्मचा-याची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय, अन्नछत्र येथे दुपारी १२.०० ते २.०० व सायंकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत दोन वेळ पोटभर भोजनप्रसादाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्याचा दैनंदिन अंदाजे ३५०० ते ४००० भाविक लाभ घेत आहेत. तसेच दर्शनरांगेत मोफत चहा व तांदळाची / शाबुदाण्याची खिचडी वाटप करण्यात येत आहे. पोलीस विभागामार्फत देखील पुरेसा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, दर्शनरांग व इतर अनुषंगीक ठिकाणची स्वच्छता मंदिर कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेमार्फत ठेवण्यात येत आहे.
या कालावधीत श्रींचे पदस्पर्शदर्शन दैनंदिन सरासरी २८००० व मुखदर्शन सरासरी २०००० भाविक घेत आहेत. भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा देण्याचा प्रयत्न मंदिर समितीचा राहणार आहे. त्यासाठी मंदिर समितीचे आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक असे एकूण ७०० व्यक्ती सेवा करीत आहेत.
मंदिर समितीने भाविकांची सोय केल्या मुळे वारकरी भाविकांनी मंदिर समितीचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.