सोलापूर प्रतिनिधी
मानवी जीवनात गुरुंना अनन्यसाधारण महत्त्व असल्याने योग्य मार्ग मिळण्यासाठी योग्य गुरुंची गरज असते. गुरुजवळ करुणा, सौंदर्यता व सुमुखत्व असे अनेक गुणवैशिष्ट्ये असतात. गुरुंजवळ शिष्यांचे रक्षण करण्याचे खूप मोठे बळ असते म्हणून गुरुबल हेच सर्वश्रेष्ठ बल आहे असे प्रतिपादन धानय्या मठपती यांनी केले.
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात आयोजित गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रवचनकार मठपती बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे खजिनदार ललिता कुंभार, प्राचार्य रविशंकर कुंभार,मुख्याध्यापक विश्वनाथ तंबाके, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले,सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीकांत त्रिशूले, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते.
प्रथम श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व श्री तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार व ललिता कुंभार यांनी व्यासपूजा म्हणून वेदमूर्ती धान्नय्या मठपती यांचे पाद्यपूजा केले.
यावेळी अण्णाराव कुंभार म्हणाले, आई-वडिलांच्या संस्कारामुळे व तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या कृपा आशीर्वादामुळे मला यशस्वीरित्या कार्य करता आले. मी गुरुंवर श्रद्धा, निष्ठा, भक्ती, विश्वास ठेवून कार्य केल्याने जीवनात आलेल्या अडचणींना सामोरे गेलो. माझ्या जीवनाचा उद्धार गुरुंमुळे झाला आहे म्हणून प्रत्येकांनी गुरुंवर दृढविश्वास ठेवावा.
याप्रसंगी माजी प्राचार्य सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, प्राचार्य रविशंकर कुंभार,मारुती कांबळे,शितल चमके, सुनीता पवार,कावेरी स्वामी आदींनी गुरुमहात्मय सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले तर उमादेवी कुंभार यांनी आभार मानले.

