पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त पंढरपुरात विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. पंढरपूर येथील वाखरी, गोपाळपूर व शेगांव दुमाला (65 एकर) या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित केले जाणार असून, त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांची संबधित यंत्रणेने तात्काळ पूर्तता करावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोबरे यांनी आज येथे दिल्या.
महाआरोग्य शिबिर पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार दूरदृष्यप्रणालीव्दारे तर शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे प्रत्यक्ष उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत उपस्थित होते.
प्र. जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. महाराआरोग्य शिबिराच्या ठिकाणी नगरपालिकेने स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालय तसेच अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करावी. तसेच आवश्यक ठिकाणी मुरूमीकरण करुन घ्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
यात्रा कालावधीत वादळी वारा व पावसाची शक्यता लक्षात घेता महावितरण विभागाने शिबिरस्थळी सुरक्षित व अखंडित वीज पुरवठा करावा. औषध पुरवठा करणाऱ्या वाहनांस पोलीस प्रशासनाने वाहन पासेस उपलब्ध करावेत. तसेच आरोग्य तपासणीसाठी वारकरी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक ते नियोजन करावे. या आरोग्य शिबिराचा जास्तीत-जास्त भाविकांना लाभ मिळावा यासाठी आरोग्य विभागाने प्रचार व प्रसार करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच महाआरोग्य शिबिराकरिता उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली असल्याचेही प्र. जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी सांगितले.
आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान 27, 28 व 29 जून 2023 या कालावधीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, महाआरोग्य शिबिरात महिला व पुरुष वारकरी भाविकांची आरोग्य तपासणीची नाव नोंदणीची स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांची सुरूवातीस तपासणी, रोग आढळून आल्यास त्वरित उपचार, विनामूल्य औषधे, गरज असल्यास मोफत संदर्भ सेवा, महात्मा फुले प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दृष्टीदोष असणाऱ्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. तरी वारकरी भाविकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी केले आहे.