सोलापूर प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील मौजे ममदापूर येथे होऊ घातलेला बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला. एका 25 वर्षीय युवकाचा विवाह 15 वर्षीय अल्पवयीन बालिका (रा. मौजे खांडवी ता. बार्शी) सोबत दत्त वस्ती, ममदापूर येथे दुपारी 12 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांना चाईल्ड लाईन 1098 द्वारे मिळाली. त्यानुसार श्री. वाघमारे यांनी जिल्हास्तरावरून सर्व सूत्रे हलवत होणारा बालविवाह रोखण्यात यश मिळवले.
सदर बालविवाह रोखणेकामी पांगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पोलीस उपनिरीक्षक डी. जी. खांडेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल उर्वते, ग्रामसेविका श्रीमती पतंगे, संरक्षण अधिकारी अमोल जमदाडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पठाण यांचे पथक तयार केले होते. सदर पथक विवाह स्थळी पोचले असता घरासमोर लग्न मंडप घातलेला दिसून आला. त्याच लग्न मंडपात पिवळ्या रंगाची साडी घातलेल्या, हातावर मेंदी काढलेल्या, हळदीचा विधी पूर्ण करून बसलेल्या बालिकेची सदर पथकाने चौकशी केली. त्यावेळी तिचे वय हे 15 वर्षे असल्याचे लक्षात येताच बालिकेस पोलीस पथकाने आपल्या ताब्यात घेतले. बालिकेचा जबाब नोंदवून बालिकेला बालकल्याण समिती सोलापूर यांच्या समक्ष हजर करण्यात आले. समितीने बालिकेस बालगृहात दाखल करून घेतले आहे.
सदर बालविवाह रोखण्याची यशस्वी कार्यवाही जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .