सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेने श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या पार्श्वभूमिवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी श्री सिध्देश्वर साखर कारखानापासून 1 किलोमीटरच्या परिसरात पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरचे कार्यक्षेत्रात दि. 13 जून रोजी दुपारी 14.00 वा.पासून पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदार दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये हा आदेश जारी केला आहे.
त्यानुसार श्री सिध्देश्वर साखर कारखाना परिसराच्या 1 किलोमीटर परिघात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण / सेवा वगळता संचार करण्यास प्रतिबंध असेल. श्री सिध्देश्वर साखर कारखाना परिसराच्या 1 किलोमीटरच्या परिघात असलेली सर्व सभागृहे, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स्, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे हे बंद राहतील. या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड संहितेचे कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल, असे आदेशात म्हटले आहे.