सोलापूर प्रतिनिधी
सोलापूरच्या सुसज्ज असणाऱ्या होटगी रोड विमानतळावरून येत्या तीन महिन्याच्या आत नागरी विमान सेवा सुरू होणार आहे. होटगी रोड विमानतळा शेजारील फक्त सिद्धेश्वर कारखान्याच्या ९२ मीटर अनाधिकृत को- जनरेशनच्या चिमणीचा अडथळा असल्याने येथून नागरी विमान सेवा सुरू होत नव्हती परंतु १५ जूनला ही चिमणी जमीन दोस्त झाल्यानंतर या विमानतळाचे डीजीसीए कडून ऑपरेशनल लायसन्स मिळण्याची तयारी अत्यंत युद्ध पातळीवर सुरू आहे व येत्या तीन महिन्याच्या आत सोलापुरातून ही विमानसेवा खात्रीलायकरीत्या सुरू होईल असे सोलापूर विमानतळाचे प्रमुख बानोत चॅम्पला यांनी सोलापूर विचार मंचच्या सदस्यांना आज होटगी रोड विमानतळाच्या भेटीदरम्यान सांगितले.
होटगी रोड विमानतळावर बहुतांश सर्व सोयी उपलब्ध असून चिमणीच्या बाजूच्या धावपट्टीचा अहवाल दोन दिवसापूर्वीच डीजीसीएला पाठवलेला आहे व विरुद्ध दिशेचा अहवाल सोमवारी पाठवला जाईल व त्यानंतर डीजीसीएकडून विमानतळास परवानगी मिळेल. सोलापूर विमानतळाची सध्याची धावपट्टी ही २.१ किलोमीटरची असून त्यावरून ७२ आसनी आर टी आर विमाने सेवा देतील.
आजच नागरी उद्ययन मंत्रालय, डीजीसीए व एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ला तातडीचे ईमेल करून येथून पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई व तिरुपती अशा ठिकाणी विमान सेवा सुरू करावी अशी विनंती करण्यात आली असल्याचे डॉ. संदीप आडके यांनी सांगितले. विचार मंचचे संजय थोबडे, डॉ. संदीप आडके, विठ्ठलराव वठारे व लिंगराज गडुर हे या भेटीदरम्यान उपस्थित होते. त्यामुळे चिमणी पडली आता विमानसेवेचे काय? या प्रश्नाला सोलापूर विचार मंच द्वारे कृती करून उत्तर देण्यात आले आहे.
त्यामुळे चिमणी व्यतिरिक्त अन्य १०५ अडथळे आहेत, होटगी रोड विमानतळ व त्याची धावपट्टी छोटी आहे, त्याचे विस्तारीकरण होऊ शकत नाही अशा सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.