पायाभूत बाबींचा अभ्यास असेल तर उत्तम कामगिरी होते- डॉ.संतोष राजगुरू
पंढरपूर प्रतिनिधी
‘सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रातील पायाभूत गोष्टींचा अभ्यास असेल तर ते त्या विशिष्ट क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतात. पायाभूत संकल्पनांच्या अभ्यासामुळे त्या ठराविक क्षेत्रात आत्मविश्वास वाढतो आणि तेवढ्याच उत्साहाने स्पर्धेत उतरता येते आणि यश देखील तेवढ्याच ताकदीने मिळते.’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्था, माढा येथील प्रा. डॉ. संतोष राजगुरू यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या 'इंग्लिश बुक रिडिंग, ड्रामा अँड लिटररी स्टुडंट क्लब' आणि 'अॅश्रे स्वेरी स्टुडंटस ब्रँच' यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.२५ एप्रिल रोजी राज्यस्तरीय स्पर्धा 'फिएस्टा २ के२३' संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून प्रा.डॉ. संतोष राजगुरू हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यक्रमाचे मुख्य कन्वेनर व शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.डॉ.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या 'फिएस्टा २ के२३' या कार्यक्रमात स्टुडंट क्लबचे प्रेसिडेंट शंभूराजे देशमुख यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनींग (अॅश्रे) च्या स्वेरीतील विभागाचे अध्यक्ष प्रा.दिग्विजय रोंगे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आजतागायत आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल सादर केला तसेच स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विविध स्टुडंट क्लब्ज व त्यांद्वारे झालेल्या कामांची माहिती दिली. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम. एस. मठपती यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
पुढे डॉ.राजगुरू यांनी विद्यार्थ्यांना ‘इंग्रजी साहित्यातील उल्लेखनीय ग्रंथ व साहित्यिक यांची उदाहरणासहित इत्यंभूत माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची आवड निर्माण व्हावी व आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी संवादकलेत आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी 'इंग्लिश बुक रिडिंग, ड्रामा अँड लिटररी स्टुडंट क्लब' ची स्वेरी मध्ये स्थापना करण्यात आली आहे तसेच अमेरिकन सोसायटी फॉर हिटींग, रेफ्रिजरेटींग व एअर कंडिशनींग' या आंतरराष्ट्रीय संघटनेची एक शाखा स्वेरी मध्ये २०१९ सालापासून कार्यान्वित आहे. इंग्रजी भाषेतील संवाद कौशल्यांना वाव देण्यासाठी 'फिएस्टा २ के २३' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 'स्पेल बी', 'रिडल क्वेस्ट', 'हॅश टॅग' व 'मि.परफेक्ट, मिस.परफेक्ट' अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये इंजिनिअरिंग बरोबरच आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि इतर शाखेचे असे मिळून एकूण २२९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा.डी.टी. काशीद यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले. प्रा.दिग्विजय रोंगे यांनी यावेळी संस्थेअंतर्गत असणाऱ्या विविध स्टुडंट क्लब्ज मध्ये सदस्य होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी आय.क्यु.ए.सी.चे समन्वयक प्रा. डॉ. एस. एस. वांगीकर व कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.स्वाती पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन काजल बारले व सनुष भाटकर यांनी केले तर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.