सोलापूर प्रतिनिधी
अडेनियम क्लब,सोलापूर आयोजित अडेनियम रिपाॅटिंग (पुर्नरोपण) कार्यशाळा गर्दीपेक्षा दर्दींच्या सहभागानें उत्साहात पार पडली.अडेनियम संवर्धक श्री.नितीन अणवेकर आणि वृक्ष संवर्धक श्री.श्रीराम रामदासी यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
अडेनियम क्लब हा परसबाग सोलापूरची या पर्यावरणीय व्यासपीठाचा उपक्रम आहे.घर तेथे बाग,बाग तेथे अडेनियम* ही या मागची संकल्पना आहे.
सात रस्ता परिसरातील जक्कल मळ्यातील श्री दत्त मंदिरामध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.भल्या मोठ्या औंदुंबर,पिंपळ आणि कडुलिंबाच्या वृक्ष छाया आणि पुष्पमालांनी सजलेल्या मंदिरातील अध्यात्मिक आणि नैसर्गिकरित्या प्रसन्न अशा वातावरणाताचा लाभ यानिमित्ताने उपस्थित अडेनियम झाडप्रेमी बागकर्मींना मिळाला.गर्दीपेक्षा दर्दींची उपस्थिती हे या कार्यशाळेचे वैशिष्ट्य ठरले.
श्री.अणवेकर यांनी गेल्या २५ वर्षापासुन स्वतःकडे अडेनियमची झाडे असुन आता त्यांची संख्या सुमारे सव्वाशे पेक्षा जास्ती असल्याचे सांगितले.सांगुन झाडांची देखभाल,निगा,खतपाणी याबद्दल माहिती दिली.या झाडाला माती लागत नसुन विशिष्ट असे माती विरहित पाॅट मिक्स वापरावे असा सल्ला उपस्थित अडेनियम प्रेमींना दिला.या झाडाला अत्यल्प पाणी लागते.देखभाल फारशी लागत नाही.तथापि उत्तम,सुदृढ वाढीसाठी देखभाल केली तर झाडं छान वाढते अशी माहिती दिली.तर श्री.रामदासी यांनी सोलापूरच्या नैसर्गिक पर्यावरणासाठी देशी वृक्षांचे संवर्धन ही आत्यंतिक निकडीचं असल्याचे सांगुन पक्ष्यांबद्दलची माहिती दिली.श्री.योगेश जक्कल यांनी अडेनियमच्या लहान झाडाचे पुनर्वरोपणाचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.त्यानुसार उपस्थित अडेनियमप्रेमींनी घरुन सोबत आणलेल्या लहान झाडांचे श्री.जक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्नरोपण केले.अडेनियमचे झाडं स्वयंसिद्ध असते. तुमचं दुर्लक्ष झाले तरी ते रुसत-फुगत नाही,नाराज होत नाही.जेंव्हा हवामान पुरक असते तेंव्हा ते निसर्गातुनच अन्न पाणी मिळवुन साठा करणे आणि प्रतिकुल वातावरणात ताठ मानेनें उभे राहते हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म असल्याचे सांगितले.त्यामुळेच सोलापूरच्या उष्ण वातावरणातही ही झाडे सहजभावानें वाढतात आणि टिकतातही अशी वैशिष्ट्ये त्यांनी विषद केली.थोडीशी देखभाल केली तर हीच झाडे तुमच्या बागेची,टेरेसची शोभा वाढवतात.मनालाही आनंद मिळतो.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांना लाल हादगा,लाल चिंच आणि ज्येष्ठ सदस्य डॉ.चंदु लब्बा यांना अडेनियमचे रोप सदिच्छा भेट म्हणून देण्यात आले.तसेच अडेनियम क्लबच्यावतीनें अडेनियमच्या रिपाॅटिंग साठी लागणारे सेंद्रिय पाॅटमिक्स नाममात्र दरात उपलब्ध करुन देण्यात आले.
प्रारंभी अडेनियम क्लबचे संस्थापक श्री.नारायण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.क्लबच्या स्थापनेसाठी हेतु सांगितला.अडेनियम हा वाळवंटातील गुलाब म्हणुन ओळखला जातो.डेझर्ट रोझ हे त्यांचे आणखीन एक नाव.त्याला सोलापूरातील हवामान मानवणारे असुन प्रत्येकाच्या बागेत,टेरेसवर हा असायला हवा असल्याचे सांगितले.
अडेनियमचे युवा संवर्धक श्री.ओम धुत्तरगावकर,ज्येष्ठ संवर्धिका श्रीमती लीलाताई हरचेकर, श्रीमती सरोज लांडगे, डॉ.चंदु लब्बा,श्री.स्वामी सवाई,डॉ.विवेक शहा,सौ.शुभदा पाटील,सौ.सीमा चाफळकर यांच्यासह अडेनियमप्रेमींनी सहभाग घेतला.