पंढरपूर प्रतिनिधी
‘१९९८ साली गोपाळपूरच्या माळरानावर 'स्वेरी' नावाचे शैक्षणिक बीज रोवले गेले. तेंव्हापासून आजपर्यंत राज्य आणि देश पातळीवर 'स्वेरी' नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. शैक्षणिक, सामाजिक आदी विधायक कार्यांबरोबरच इतर उपक्रमांमुळे स्वेरीमधील वातावरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक बनले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या कुशल आणि नियोजनपूर्ण मार्गदर्शनाखाली आणि उच्चशिक्षित, अनुभवी प्राध्यापकांच्या सहकार्याने विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी 'स्वेरी' दिवसरात्र मेहनत घेत असते. कुंभार ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला विशिष्ट आकार देऊन मातीची सुंदर भांडी तयार करतो अगदी त्याचप्रमाणे ‘स्वेरी’ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययनाबरोबरच संस्काराचेही विशेष धडे दिले जातात.
त्याच पार्श्वभूमीवर ‘स्वेरी’मध्ये पदवी इंजिनिअरिंगमधील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रख्यात वक्ते आणि प्रशिक्षक नानासाहेब साठे यांनी ‘एनएलपी फॉर स्टुडंटस् / इनर वेलनेस/ फ्रंट लोब अॅक्टीवेशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. दि.२७ मार्च ते ०२ एप्रिल २०२३ या दरम्यान ही कार्यशाळा पार पडली. स्वेरी अभियांत्रिकीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस. मठपती आणि प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ.एस.ए.लेंडवे यांनी आठवडाभर चाललेल्या या कार्यशाळेचे उदघाटन केले. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत करण्यासाठी प्रशिक्षकांकडून प्रोत्साहनपर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक विभागातील समन्वयकांनी या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी स्वेरीचे सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.