शैक्षणिक व सामाजिक कार्यामुळे स्वेरीचे स्थान अधिक भक्कम
पंढरपूर प्रतिनिधी
‘जेंव्हा नव्हते चराचर, तेंव्हा होते पंढरपूर’ असे म्हटले जाते ! अर्थात साक्षात पांडुरंगाच्या भेटीसाठी अवघ्या विश्वातील भक्तगण पंढरीला येत असतात. १९९८ साली स्वेरीने ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाची मुहूर्तमेढ पंढरीच्या पायथ्याशी अर्थात गोपाळपूरमध्ये रोवली त्यामुळे पंढरीच्या शैक्षणिक वैभवात आणखी भर पडली असून अफाट परिश्रम घेत आज स्वेरीच्या बीजाचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे. स्वेरीला २५ वर्षांच्या शैक्षणिक तपश्चर्येचे फळ मिळत असून हजारो विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची गोडी लागल्याने आज ते विद्यार्थी जागतिक पातळीवर आणि मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. स्वेरीच्या अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धीक विकासास हातभार लागत असून त्यांच्या व्यावसायिक क्षमता देखील भक्कम होत आहेत. स्वेरीचे हे योगदान जसजसे लक्षवेधी ठरत आहे तसतसे आता पंढरीच्या पांडुरंगा बरोबरच माळरानावरील शैक्षणिक विठ्ठल मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
‘इस्रो’ ही भारतातील प्रमुख अंतराळ संस्था आहे. भारताला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यात इस्त्रोचे खूप मोठे योगदान आहे. अंतराळ आणि त्यासंदर्भात संशोधन करणे हे मुख्य कार्य असलेल्या इस्रोचे शास्त्रज्ञ व्ही.व्ही. गणेश यांनी स्वेरीला नुकतीच सदिच्छा भेट देवून स्वेरीतील संशोधनासंबंधी माहिती जाणून घेतली. त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. गणेश हया देखील उपस्थित होत्या. या शास्त्रज्ञ दाम्पत्यांचे स्वागत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार व पब्लिसिटी अँड प्रोटोकॉलचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी केले.
शास्त्रज्ञ व्ही.व्ही. गणेश हे भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर ऑगस्ट १९८८ मध्ये इस्रोच्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये रुजू झालेले शास्त्रज्ञ आहेत. यांच्यावर भारतीय व परदेशी रिमोट सेन्सिंग मिशन्सवर मायक्रोवेव्ह, उच्च रिझोल्यूशन डेटा प्रसारासाठीची जबाबदारी होती. त्यांनी पहिल्या भारतीय मायक्रोवेव्ह उपग्रहासाठी प्रकल्प व्यवस्थापकाची अतिरिक्त जबाबदारी देखील उत्तमरित्या सांभाळली आहे. शास्त्रज्ञ व्ही.व्ही.गणेश हे पृथ्वी निरीक्षण तंत्रज्ञान सेवांसाठी जबाबदार असलेल्या विविध समित्यांचे सदस्य देखील आहेत. भूस्थानिक तंत्रज्ञानातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्प, कार्यक्रमांशी ते संबंधित आहेत. सध्या ते पुढील वर्षी सुरू होणाऱ्या इस्त्रोतील नासा जेपीएल जॉईन्ड मिशनचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून सध्या ते आउटरीच विभागाचे प्रमुख देखील आहेत. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी इस्त्रो विविध स्तरांवर कार्यरत आहे. एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत असणारे शास्त्रज्ञ व्ही.व्ही. गणेश यांनी नुकतेच स्वेरीचा संशोधन विभाग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आदी विभागांना भेट देऊन माहिती जाणून घेतली.
स्वेरीचा पंढरपूर पॅटर्न, शिक्षण पद्धती, आदरयुक्त शिस्त व संस्कार तसेच विविध शैक्षणिक, विधायक व सामाजिक उपक्रम पाहून ते भारावून गेले. स्वेरीच्या परंपरेस अनुसरून शास्त्रज्ञ व्ही.व्ही. गणेश व सौ. गणेश यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘येणारा काळ हा विद्यार्थ्यांचा असणार आहे.
स्वेरीचे शैक्षणिक कल्चर पाहता स्वेरीतील विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञानातील योगदान हे भविष्यात महत्वाचे ठरणार आहे.’ असे गौरवोदगार काढले तसेच भविष्यात स्वेरीच्या संपर्कात राहून विविध पातळीवर एकत्र कार्य करण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.