पंढरपूर प्रतिनिधी
“कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय हे सोलापूर जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालय असून या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे उपक्रम सातत्याने राबविले जातात. जो विद्यार्थी प्रामाणिक आणि तळमळीने ज्ञानाचे कण गोळा करतो. तो जीवनात निश्चितपणे यशस्वी होतो. महाविद्यालयाने राबविलेल्या उपक्रमातून आजवर हजारो विद्यार्थी समाजाला विविध क्षेत्रात सेवा देताना आढळून येतात. रयत शिक्षण संस्थेचा श्रमाचा संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्याची शिदोरी देणारा असतो. म्हणून विद्यार्थ्यांनी सतत सजग राहून ज्ञान आणि माहिती मिळविली पाहिजे.” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते सोमनाथ गायकवाड यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त
महाविद्यालयात रुसा काम्पोनंट ८ अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.
सोमनाथ गायकवाड पुढे म्हणाले की, “महाविद्यालयीन विद्यार्थी हे संस्कारक्षम असतात. या वयात त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांना आयुष्यभर उपयोगी पडत असतात. विद्यार्थ्यांच्यात अनेक कला गुण असतात. त्या कलागुणाचा विकास करणे हाच शिक्षणाचा मूळ उद्देश असतो. माणसाचे जीवन सुखी आणि आनंदी बनण्यासाठी या कला उपयोगी ठरतात. कलेमुळे कलाकाराची ओळख निर्माण होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय राबवीत असलेले उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी हितावह आहेत.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “माजी विद्यार्थी ही महाविद्यालयाची खरी संपत्ती असते. विद्यार्थी समाजजीवनात जेंव्हा प्रभाव निर्माण करून आपले अस्तित्व सिद्ध करतात. तेंव्हा आम्हाला खूप आनंद होत असतो. महाविद्यालयात राबविल्या जात असलेल्या उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. कला या माणसाचे जीवन आनंदी करण्यासाठी असतात.विद्यार्थ्यांचा भावनिक विकास व्हावा. त्याच्या कलेला दाद मिळावी. यासाठीच महाविद्यालय कार्यशाळा आणि चर्चासत्राचे आयोजन करत असते.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा महोत्सव समितीचे चेअरमन प्रा. डॉ. प्रशांत नलवडे यांनी केले. या दोनदिवसीय कार्यशाळेत वक्तृत्त्व, काव्यवाचन, समूहगीत, सुगम गायन, तालवाद्य, मातीकाम, पोस्टर पेंटिंग, पथनाट्य, भारुड, पोवाडा, नकला, मूकनाटय, मेहंदी या कलाप्रकाराची माहिती देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट सादरीकरणास पारितोषिक देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून डॉ. नामदेव शिंदे, सोमनाथ गायकवाड, चंद्रशेखर तेलंगे, विजय वाघमारे, शरद विभूते, के. डी. पानसांडे, एस.एच. नडे, अजितकुमार साबळे, संध्या गोपाळ साखी, शाम सावंजी, श्रुती ढाले, मयुरी बळवटकर आदीचे मार्गदर्शन असणार आहे. यावेळी मंचावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे, समारंभ समितीचे प्रमुख प्रा. डॉ दत्तात्रय डांगे, वाङ्मय मंडळाचे प्रमुख प्रा. धनंजय वाघदरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सिनिअर विभागातील
शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती सुडके यांनी केले शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. रमेश शिंदे यांनी मानले.