यशस्वीतेसाठी परिश्रमाबरोबरच योग्य दिशा हवी. . व्यवस्थापक अमर माळी
पंढरपूर प्रतिनिधी
‘प्रत्येकामध्ये ज्ञान मिळविण्याची भूक असायला हवी. सध्याच्या युगात सर्व गोष्टींमध्ये परिपूर्ण असा एकही माणूस मिळणार नाही. परंतु प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला नक्कीच मिळत असते. यासाठी प्रथम आपल्यातील उणीवा शोधून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्यात समृद्धी आणि संस्कार दोन्ही गोष्टी येतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षक, आई वडिलांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन महत्वाचे असते. प्रत्येक ठिकाणी आपण संधी शोधायला हव्यात. त्यातूनच यशाचा मार्ग सापडत असतो. म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रचंड परिश्रमाबरोबरच योग्य दिशा असायला हवी.’ असे प्रतिपादन स्वेरीचे माजी विद्यार्थी व कमिन्स टेक्नोलॉजी इंडीया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक अमर माळी यांनी केले.
येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ‘ऋणानुबंध २०२३’ हा अतिशय उत्साहात संपन्न झाला. इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडलेल्या या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरीचे माजी विद्यार्थी व कमिन्स टेक्नोलॉजी इंडीया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक अमर माळी बोलत होते. स्वेरीतून उत्तीर्ण झालेले व महाराष्ट्र राज्याबरोबरच इतर राज्यात व देश विदेशात मोठमोठया पदावर कार्यरत असलेले व उद्योजक असलेले स्वेरीचे अनेक माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते.
यावेळी व्यासपीठावर स्वेरीच्या माजी विद्यार्थिनी व डॉईश बँकेच्या असिस्टंट व्हाईस प्रेसिडंट अश्विनी करपे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर, संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, संघटनेचे सचिव प्रा.अविनाश मोटे, प्रा.व्ही.डी. जाधव आदी होते. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करून स्वेरीची जडणघडण सांगून ‘माजी विद्यार्थी हे स्वेरीचे कायमच आयकॉन राहिले आहेत. त्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेले परिश्रम अदभूत असून स्वेरीच्या जडणघडणीत माजी विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे’ असे सांगून स्वेरीच्या यशस्वी वाटचालीवर प्राचार्य डॉ.रोंगे यांनी प्रकाश टाकला.
या मेळाव्यात कोणी प्रशासकिय अधिकारी तर कोणी स्वतःच कंपनीची स्थापना केली आहे, तर काहीजण कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर, काहीजण शिक्षक, काहीजन बिझनेसमन म्हणून कार्यरत असूनही या मेळाव्यात मात्र विद्यार्थी म्हणूनच वावरताना जाणवत होते. या मेळाव्याच्या निमित्ताने स्वेरीचे माजी विद्यार्थी डॉ.अनिल पिसे (जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका), गणेश गायकवाड (स्वीडन), शंकर गायकवाड (जर्मनी), प्रा.अजिंक्य देशमुख, समाधान गायकवाड, सुभाष काकडे, विरेंद्र पवार, प्रेमकुमार खंदारे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात ‘शिक्षण सर्वत्र देतात परंतु शिक्षणाबरोबरच संस्कार फक्त स्वेरीतच मिळते. स्वेरीमधून मिळालेल्या शिक्षणातून आणि शिस्तीमुळे आम्हाला सर्व प्रथम माणूस बनता आले, स्वेरीतील शैक्षणिक वातावरणाचा आणि विविध विद्यार्थी पूरक सुविधांचा आम्हाला खूप फायदा झाला' असे आवर्जून नमूद केले.
यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर यांनी माजी विद्यार्थी संघटनेबद्धल सविस्तर माहिती दिली. त्याबरोबरच ‘माजी विद्यार्थी संघटना’ विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, अश्विनी करपे, डॉ.संदीप वांगीकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. ‘ऋणानुबंध- २०२३’ हा मेळावा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर, उपाध्यक्ष दत्तात्रय घोडके, सचिव प्रा. अविनाश मोटे यांच्यासह संघटनेच्या व अभियांत्रिकीच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गावर जावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कॉलेजच्या आवारात माजी विद्यार्थ्यांनी सेल्फी देखील काढल्या. या मेळाव्यासाठी स्वेरी अभियांत्रिकीच्या स्थापनेपासून ते गतवर्षापर्यंत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी केले तर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकर यांनी सर्वांचे आभार मानले.