पुणे प्रतिनिधी
दिनांक १५ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे झालेल्या त्यागमूर्ती माता रमाई शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती व महिला संविधान परिषदेत (एकदिवसीय) बोलतांना बार्टीचे महासंचालक आयु. धम्मज्योती गजभिये यांनी आपल्या उद् घाटनिय भाषणात सामाजिक चळवळीतील स्त्री शक्तीचे महत्व अधोरेखित करतांना स्त्रियांनी आपल्या अधिकार , हक्क याविषयी जागृत असले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिला शक्ति ओळखून महिलांच्या संघटना असाव्यात याची आठवण करून देत सामाजिक चळवळी जिवंत ठेवायच्या असतील तर महिलांनी जागृत असावे असे मत त्यांनी मांडले.
बार्टीच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना आहेत त्याविषयी माहिती घेऊन त्या समाजातील तळागाळातील वंचित घटकापर्यंत खरोखरच पोहचतात याविषयी माहिती घेऊन वेळोवेळी बार्टीला विचारणा करून त्या योजनाचा कश्या पद्धतीने गरजू महिलांपर्यंत पोहचविल्या पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक प्रगतीत महिलांचा सहभाग असणे खूप महत्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केली होती. धम्म चळवळ , हिंदू कोड बिल महिलांचे हक्क आणि कर्तव्य , महिला आणि अंधश्रद्धा अश्या विविध विषयावर वैचारिक मंथन या परिषदेत करण्यात आले. आणि माता रमाबाई आंबेडकर यांचे बाबासाहेबांच्या सहचारिणी म्हणून सामाजिक जीवनातील कार्य, त्याग परिषदेच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला.
प्रा. ज्योती धुतमल , प्रा. सुरेखा नागटिळक , डॉ. विद्या राईकवार, अड. मनीषा महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. रमा सोनावणे होत्या. विविध भागातून महिलांनी उत्फुर्तपणे सहभाग नोंदविला. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव यावेळी करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे, नालंदा फाउंडेशन चिंचवड, भारतीय बौद्धजन विकास समिती पिंपरी महिलांनी मेहनत घेतली.