अरण प्रतिनिधी
संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी तिर्थक्षेत्र अरण याठिकाणी सर्वात उंच वारकरी ध्वज ऊभारण्यात येत असून याचा लोकार्पण सोहळा रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी दु. १.०० वाजता होणार असल्याची माहिती सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सृजनशिल युवा नेतृत्व आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सर्वात ऊंच असणारा वारकरी ध्वज श्रीक्षेत्र अरण जि. सोलापूर येथे साकारतोय हि बाब वारकरी संप्रदायासह तमाम माळी समाजासाठी आनंदाची व अभिमानास्पद आहे. याप्रसंगी संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज श्री रमेश महाराज वसेकर यांच्यासह समस्त वंशज मंडळी यांचे आशिर्वाद लाभणार असून मंदिर विश्वस्त समिती व अरण येथील प्रतिष्ठीत गावकरी यांचे मोलाचे सहकार्य आहे.
या संस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध भागातून वारकरी मंडळी व माळी समाज बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी उपस्थित रहाण्याचे अवाहनही पत्रकाच्या शेवटी श्री. आखाडे यांनी केले आहे.