पंढरपूर प्रतिनिधी
नुकत्याच पश्चिम बंगाल मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय खोखो स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या महाराष्ट्राच्या संघातील तीन यशस्वी खेळाडूंचा आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यातील पंढरपूर तालुक्यातल्या वाडी कुरोली येथील वसंतराव काळे प्रशालेची विद्यार्थिनी प्रीती काळे ही या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली असून तिला मानाचा जानकी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तिच्या या यशामुळे सोलापूर जिल्ह्याची मान उंचावली आहे. प्रीती काळे हिने आत्तापर्यंत नऊ राष्ट्रीय स्पर्धात सहभागी होऊन आठ वेळा सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्याबद्दल सुभाष देशमुख यांनी तिचे कौतुक केले आणि तिच्या क्रीडा क्षेत्रातल्या आणि शिक्षणातल्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी तिचे प्रशिक्षक श्री संतोष पाटील हेही उपस्थित होते. गेल्या वर्षी प्रीती काळे हिला सोलापूर सोशल फाउंडेशन चा श्रीमंती सोलापूरची हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.
याच वेळी राष्ट्रीय स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या महाराष्ट्राच्या संघातील दिपाली राठोड, पुणे आणि सानिका निकम सांगली यांनाही माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी हे उपस्थित होते.