पंढरपूर प्रतिनिधी
" लोकसहभागातून ग्राम विकास - गाव हे विकासाचे केंद्र " हे ब्रीद वाक्य घेवून सोलापूर सोशल फाउंडेशन "समृद्ध गाव अभियान" राबवित आहे. या अंतर्गत गावाला आपली शक्तीस्थळे ओळखून लोकसहभागाच्या माध्यमातून कशाप्रकारे आपले गाव समृद्ध करता येईल यासंदर्भात एक समृद्ध गावाचा आदर्श आराखडा दिला जात आहे. यात सहभागी गावाला "ग्रामीण पर्यटन" विकासासाठी प्रोत्साहित करण्याचे काम केले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे या दृष्टीने सध्या प्रयत्न करीत आहेत.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली हे गाव सुद्धा आपली शक्तीस्थळे ओळखून लोकसहभागाच्या माध्यमातून गावाचा विकासाचा पुढील टप्पा गाटण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकसहभागातून सरकोली ग्रामीण पर्यटन स्थळ निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे.
या अंतर्गत शिल्प संग्राहालय, टीचर्स गार्डन, ज्ञानेश्वर -तुकाराम भालके शांत अभ्यासिका, मान सनसेट पॉईंट निर्मिती, जुनी परंपारिक वस्तूचे पुनर्जिवन करणे, जय जवान - जय किसान स्टॅचू, स्पोर्ट्स - योगा - स्लो डान्स गार्डन या सारख्या अनेक स्पॉट निर्मितीचे काम लोकसहभागाच्या माध्यमातून सुरु आहे.सदर सरकोली ग्रामीण पर्यटन स्थळ निर्मितीसाठी विविध माध्यमातून अर्थसाह्य मिळत आहे. शिवाय शासकीय स्तरावरून, लोकप्रतिनिधी मार्फत या कार्याची याची दाखल घेतली जात आहे.
गावातील काही मंडळी पुढे येऊन सदर ग्रामीण पर्यटन स्थळ निर्मितीच्या कामासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. येत्या काळात सरकोली ग्रामीण पर्यटन स्थळ नक्की सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळा पैकी एक म्हणून उदयास येईल.