सोलापूर प्रतिनिधी विठ्ठल वाठारे
सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून विमान सेवा त्वरित सुरू करावी याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक 12 डिसेंबर पासून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर दररोज सकाळी 11 ते 12 या वेळेत हलगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर विचार मंचचे सदस्य संजय थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेची परवानगी न घेता तसेच डीजीसीए यांची सिद्धेश्वर कारखान्याने एनओसी न घेता आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे 92 मीटर उंचीची वीज निर्मितीची चिमणी उभारली आहे. आजच्या तारखेपर्यंत या प्रकल्पाला एनव्हायरनमेंटल क्लियरन्सचे प्रमाणपत्र नाही. जिल्हा न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद, मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांनी देखील ही चिमणी बेकायदेशीर असल्यामुळे आजवर कारखान्याचे सर्व दावे फेटाळले आहेत.
हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी कारखान्याची सुनावणी घेऊन त्वरित निकाल देण्याबाबतचा आदेश दिला आहे तरीही याबाबत निकाल दिला जात नाही. बेकायदेशीर बांधलेल्या चिमणीला डीजीसीए कडून एनओसी मिळू शकत नाही त्यामुळे चिमणी पाडल्याशिवाय होटगी रोडवरील विमानसेवा सुरू होणार नाही आणि गेल्या दहा वर्षापासून आपण बोरामणी विमानतळाचे स्वप्न बघतोय आज पर्यंत तिथे काहीच झाले नाही त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये होटगी रोड वरून त्वरित विमान सेवा सुरू होऊ शकते मात्र याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे.
सोलापूर विकास मंचने कोणतेही ठोस आश्वासन न घेता हे उपोषण बंद केले शिवाय महापालिका आयुक्तांनी बेकायदेशीर चिमणी बाबत निर्णय दिला नाही. त्यामुळे 12 डिसेंबर पर्यंत महापालिका आयुक्तांनी याबाबत निकाल द्यावा अन्यथा आम्ही बारा डिसेंबर पासून दररोज सकाळी 11 ते 12 या वेळेत सोलापूर महापालिकेच्या गेटवर दररोज हलगीनाद आंदोलन करणार आहोत.