माजी राज्यमंत्री आमदार मा.श्री. रविंद्र वायकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज,मुंबई या संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व स्मरणिकेचे प्रकाशन हा समारंभ शनिवार दिनांक ८ आॕक्टोबर, २०२२ रोजी दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार रविंद्र वायकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हीरक महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या समारंभास विषेश अतिथी म्हणून सिनेअभिनेते सुशांत शेलार, कोकण भूषण पुरस्कार प्राप्त आबासाहेब सावंत व नगरसेवक बाळा नर उपस्थित होते. रवींद्र वायकर यांनी संस्थेचे संस्थापक कै.वि.ना. उर्फ भाऊ शिंदे, त्यांचे सहकारी कै.प्रभाकर विश्वासराव, कै.पालकर गुरूजी, कै.शंकरराव पवार, कै.मधू मोरे, कै.माधवराव गुजर, कै.भास्कर घाग, मनोहर शेलार व भास्कर कदम यांना अभिवादन केले.
तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीकृष्ण विचारे, कार्याध्यक्ष मोतीराम विश्वासराव, उपकार्याध्यक्ष शजनार्दन विश्वासराव व सहदेव सावंत, सरचिटणीस जितेंद्र पवार, खजिनदार मंगेश पंडित, चिटणीस सुरक्षा घोसाळकर व यशवंत साटम, व सहखजिनदार प्रशांत कदम व आजी माजी पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांचे संस्थापकांचा वारसा पुढे चांगला चालवत असल्याबद्दल कौतुक व अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे या यशामध्ये सुरवातीपासून ज्ञानदानाचे पवित्र काम केलेल्या सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे मोठे योगदान आहे असे सांगितले व सर्व शिक्षकांचे मन: पुर्वक अभिनंदन केले. प्रा.आबासाहेब सावंत यांनी खडतर परिस्थितीत जोगेश्वरी सारख्या भागात संस्थेने कौतुकास्पद काम केले आहे असे उदगार काढले.अभिनेता सुशांत शेलार यांनी शानदार कार्यक्रम सादर केल्याबद्दल सर्व विद्यार्थी बालकलाकारांचे कौतुक केले.
कोकणातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणार आहे असे सांगितले.नगरसेवक व माजी विद्यार्थी बाळा नर यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक करताना उपकार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल चे चेअरमन सहदेव सावंत यांनी संस्था चालवित असलेल्या बालविकास विद्या मंदिर व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल या शाळांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
माजी मुख्याध्यापक कै.सुमन चोगले यांनी सेवानिवृत्तीचे ७१४५०१/- संस्थेला दिले व त्यातून चोगले सभागृह उभारले अशी माहिती सहदेव सावंत यांनी दिली.शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले सण, शिवरायांचे शिलेदार व प्रौढ साक्षरता अशा विषयांवर डान्स व नाटीका सादर केली. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणें पहिल्या मुख्याध्यापिका सुधा दामले, शिवसेना विभागप्रमुख विश्वनाथ सावंत, मराठी उद्योग समाज चे अध्यक्ष सुहास तावडे, झी टीव्ही चे सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट शैलेश सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सरचिटणीस जितेंद्र पवार यांनी सर्वांचे आभार मानले.