माझे गाव माझी जबाबदारी ( भाग -१)
शिक्षण...
खरा भारत हा खेड्यात वसला आहे.भारताची जवळपास ६० ते ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते.जेव्हा खेड्यांच्या विकासावर भर दिला जाईल तेव्हाच भारत कणखर व मजबूत देश बनेल.आज घडीला जे देश द्वितीयक , तृतीयक,चतुर्थ व पंचक व्यवसायात गुंतलेले आहेत.असेच देश जगावर राज्य किंवा अधिसत्ता गाजवू लागले आहेत.
भारतातील काही तुटपुंजी लोक ज्ञानाची शिदोरी घेऊन भारताचे राजे समजू लागले आहे व भारताला जागतिक पातळीवर आम्ही कसे आहोत म्हणून आकड्यांचा खेळ नाचवत डांगोरा पिटत आहेत. त्यांनी प्रथम ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून प्रथम मी भारतीय व आम्ही भारतीय म्हणून भारताच्या प्रत्येक व्यक्तीला परिपक्व शिक्षण कसे मिळेल याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आज ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.त्याला कारणीभूत कोण आहे ?कोण भारतीय जनतेवर जाती धर्माच्या नावाखाली कपटी कारस्थान खेळत आहेत हे पाहणे गरजेचे आहे.या साठी खरा जनतेतून आवाज उठणे गरजेचे आहे.
*एखादा धर्म बुडाला म्हणून गुलामगिरी येणार नाही.परंतू लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या कुटील कारस्थानाने देशातील ग्रामीण भागाचे कधीही भले होणार नाही.शिवाय मुलामगिरीच्या तावडीतून त्याची कधीच सुटका होणार नाही.*
*म्हणून देशातील राजकीय व्यवस्थेवर लक्ष न देता स्वतः हुन विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी प्रथम शिक्षण व्यवस्थेतील अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे.आज आपण ज्या राजकीय पक्षांची व नेत्यांची लुगडी धुतो त्याची मुलं प्रथम काय करतात.हे ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांनी पाहावे.*
त्यांची मुले ज्या शाळेत शिकतात त्या शाळेत शैक्षणिक सहली काढा.असा हेका चटयाधारकांनी करावा. निवडणुकीत एक मटणाचा तुकडा, तांबडा रस्सा,दारू व ५०० ते १००० रूपयाने तुमचे भले कधीच होणार नाही. आता वेळ आली आहे.
*नको मद्यालय आम्हाला हवे आहे विद्यालय म्हणण्याची*
आज भारत गरीब देशाच्या यादीत १०७ व्या क्रमांकावर का राहिला.त्याते प्रमुख कारण हेच आहे. अजून ही ग्रामीण भागाला अंधारात ठेवून राज्य करण्याचे डावपेच आखले जात आहेत. *खाजगी शाळा वाढवून सरकारी शाळा बंद पाडण्याचे कटकारस्थान सुरू आहे.*
आज माझ्या ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्याचा फायदा उठवून राजकीय पापे करू नका.राजकीय लोकांनी भारतीय भूमीवर केलेली पापे धुवून काढण्यासाठी आता जनता लढाच महत्वपूर्ण ठरेल.
मग गावचा विकास,गावचा कारभार सुरळीत करायचा असेल तर माझ्या देशाच्या मातीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या समाजातील लोकांनी व प्रत्यक्ष नागरिकांनी पुढाकार घेऊन ताट मानेने संघर्ष करत पुढे येणे गरजेचे आहे. वाड्या वस्त्यावरील , गावातील शिक्षणाचा भक्कम पाया मजबूत करणे. आजही ग्रामीण भागात लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे लोक मुग गिळून गप्प आहेत. शिक्षणाच्या बाजारपेठेची स्थिती अतिशय वाईट होत चालली आहे.तशी जाणून बुजून केली जात आहे.मुठभर लोकांच्या सत्ता केंद्रासाठी...
स्वतः पालकांनी आपला पाल्य,आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.आपल्या मुलाला/मुलीला या स्पर्धेच्या युगात स्थिर करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. भले शासन सरकारी शाळांकडे दुर्लक्ष करत असेल, सरकारी शाळेतील शिक्षकांना शिकविण्यापलिकडची कामे लावत असेल तर जन आंदोलन करून शिक्षकांची १०० टक्के शाळेत उपस्थिती बाबत सरकारला व शिक्षण मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी पुढे आले पाहिजे.
ग्रामीण भागातील लोकांनी आपले पाल्य ,आपली जबाबदारी स्वीकारून ज्या शाळेत माझा मुलगा/ मुलगी शिकते.तेथील शैक्षणिक वातावरण काय आहे ? कसे आहे ? माझ्या मुलावर / मुलींवर चांगले संस्कार घडतात का ? माझ्या मुलाला/ मुलीला आधुनिक दर्जाचे शिक्षण मिळतेय का ? माझा मुलगा/मुलगी कोणत्या इयत्तेत शिकत आहे. त्यांना शिकवणारे शिक्षक कोण आहे. भले आपल्या आर्थिक परिस्थिती मुळे शाळेकडे जाता येत नसेल तर शिक्षकांना आपले मित्र करा. तेही जमत नसेल तर एक फोन करून आपल्या मुलाची जबाबदारी म्हणून त्यांच्या शैक्षणिक स्थितीचा अहवाल मागणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी पालक व शिक्षक हा कोन जेव्हा मजबूत होईल तेव्हा ग्रामीण भागच स्वतः चे एक साम्राज्य निर्माण करेल.तेव्हा आपण ज्या राजकीय लोकांच्या नावाने बोटे मोडतो ती चांडाळ चौकडी आपल्या गावापर्यंत येईल.त्याना रेड कार्पेट टाकण्याची काय गरज आहे ? त्याचे पाय धुऊन पाणी प्यायची सुध्दा गरज नाही.
ग्रामीण भागातील पालकांनी आपला मुलगा/मुलगी त्यांचे शिक्षक व ज्या शाळेत शिकतात.त्यांना आपले दैवत मानून आपल्या बाळाची प्रगती हीच माझी प्रगती मानून सेवा केली तर ईश्वर ही तुम्हाला वेळात वेळ काढून भेटायला येईल. त्यामुळे आपला मुलगा जिथे शिकतो तिथले शैक्षणिक वातावरण शिक्षणाला पुरक आहे का हे तपासून पाहणे बाप किंवा आई म्हणून आपले कर्तव्य आहे.गावात किंवा शाळेत ग्रंथालय असेल तर मोठ मोठे वाढदिवस,मोठ मोठ्या मेजवान्या, अंधश्रद्धा यांना फाटा देऊन आपल्या परीने शक्य होईल तेवढी चांगली पुस्तके त्या शाळेला किंवा गावातील सार्वजनिक ग्रंथालयांना भेट द्या.
अजून खूप काही करता येते सरकारवर भरोसा न ठेवता सुज्ञ पालकांनी पुढाकार घेऊन चांगले शिक्षण माझ्या पुढच्या पिढीला कसे देता येईल यावर भर द्यायला हवा.
मग पालकांनी काय करावे. पालकांनी एकत्र यावे..? आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी चर्चा कराव्यात.ज्या अडचणी आपल्या मुलाला येतात त्या दूर करण्यासाठी पदरमोड केली तरी काय हारकत आहे. ? शासन रामभरोसे आहे. ते आपल्या मुलाची डोकी सुधारण्यासाठी योजना आणतील की नाही माहीत नाही.पण भडकविण्यासाठी नक्कीच आणतील.
शेवटी येवढेच माझ्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत. यासाठी प्रार्थना केली पाहिजे. त्यासाठी गरज आहे पालकांच्या पुढाकांराची...आपली कामे तर आयुष्य राहणार आहेत..जिथे आपली मुलं शिकतात त्या शाळेत किमान महिन्यातून एक फेरफटका मारायला हवाच..तिथले शैक्षणिक वातावरण जाणून घेणे आपले परम कर्तव्य आहे. आपल्या मुलाच्या बोलण्यावर ,वर्तणुकीकडे त्यांच्या राहणीमानीकडे, तो शाळेत तर जातो का यांची चौकशी करणे,किमान महिन्यातून त्याची वह्या, पुस्तके तपासून पाहणे हे सुद्धा आई व बाबा म्हणून आपले कर्तव्य आहे.
असे झाले तर केंब्रिज विद्यापीठातील संशोधक ही माझ्या ग्रामीण भागापर्यंत संशोधन करण्यासाठी नक्कीच येतील
प्रा.आनंदा आलदर - 9765066247