वाळूज(मोहोळ) प्रतिनिधी
विजयादशमी दिवशी म्हणजेच दसऱ्याचा दिवशी वाळूज येथील कादे यांच्या शेतात अज्ञात चार चोरट्यांनी शेतामध्ये जात असलेल्या ३६ वर्षीय महिलेला अडवून मारहाण करत तोंडावर पावडर टाकून बेशुद्ध करून ६८ हजाराचे (दागिने) चांदी व सोने लुटल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात मोहोळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज तालुका मोहोळ येथील सग्जना बाबासाहेब खरात वय ३६ या विजयादशमी दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे शेतामध्ये चालत चालल्या होत्या. अचानक वाटेवरील कादे यांच्या द्राक्ष बागेतून समोरून तोंडाला काळे कापड बांधून दोघेजण आणि पाठीमागून दोघे जण असे चौघांनी मिळून सजना खरात यांना अडवले आणि तोंडावर कसली तरी पावडर टाकली. सग्जना खरात यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यावरील टोपली पाडली. त्यांना मारहाण केली. पावडर टाकल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. बेशुद्ध पडल्याची खात्री होताच चोरट्यानी त्यांच्या अंगावरील गंठन, फुले, झुबे, जोडवी असे मिळून ६८ हजार रुपये किमतीचे (दागिने) सोने-चांदी चोरून पळून गेले.
याबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी सग्जना खरात यांना मोहोळ येथील दवाखान्यात प्रथम उपचार करून सोलापूरातील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. अशी फिर्याद सग्जना खरात यांनी मोहोळ पोलीस स्टेशन येथे दिली. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे हे करीत आहेत.