माझं गाव,माझी जबाबदारी ( भाग - 2 ) आरोग्य
आरोग्य
जिथे आपलं गाव, माझं गाव ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी 100 % सर्व स्तरातील लोकांकडून प्रयत्न केला जातो.त्यावेळी सुंदर,स्वच्छ व आरोग्य संपन्न गाव व्हायला वेळ लागत नाही.
सर्वप्रथम माझ्या गावातील मुलांना गावातच चांगले संस्काराचे शिक्षण कसे मिळाले पाहिजे याचा विचार व्हायला हवा.खर तर इथेच गावची लोक चुकतात,पैसा झाली की पैसेवाले व गावचा मीच वस्ताद समजणारे लोक आपली मुलं पैशाच्या जोरावर गावातून बाहेरच्या शाळेत शिक्षणाला घालवतात.पुढाऱ्याची मुलं जेव्हा गावाची सीमा ओलांडून बाहेर जातात. तेव्हा शाळांवर लक्ष ठेवणारी कर्तव्य दक्ष मानसंच शाळेकडे वळून सुध्दा पाहत नाहीत.
शिक्षण झालं की मुख्य प्रश्न येतो आरोग्याचा .जर मुलांना चांगले शिक्षण मिळाले की मुलं सुध्दा आरोग्याकडे लक्ष केंद्रित करतील.आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी काय करावे..?
१) माझं गाव माझी जबाबदारी स्वीकारून जबाबदारी घेणाऱ्या पालकांचा / लोकांचा दबाव गट निर्माण झाले पाहिजेत.
2) गावातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवणारा प्रामाणिक लोकांचा एक मजबूत गट असावा.
3) प्रत्येक शाळेत शिक्षक - पालक संघ असतो. त्यांनी ही शाळेत आरोग्यावर काही करता येईल का ? याबाबत विचार मंथन करून विद्यार्थ्यांना स्वतः च्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी. यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करावीत.
4) गावातील शासकीय दवाखाने पूर्ण क्षमतेने चालवले जातात का..? याकडे लक्ष देणारी ग्रामपंचायतीने एक स्वतंत्र यंत्रणा तयार करता येतो का याकडे लक्ष द्यावे.विशेष शासकीय दवाखाने पूर्ण क्षमतेने चालवले जातात का पाहणे गरजेचे आहे. खाजगी डाॅक्टरांचे त्यांचे जीवन धागे जुळलेले आहेत का पाहणे गरजेचे आहे.
5) गावांत मावा,तंबाखू व पान खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकून आरोग्याला धोकादायक ठरू पाहणाऱ्या लोकांवर व पानटपरी धारकांवर काही कारवाई करता येईल का याकडे लक्ष द्यावे.
6) गावात निर्माण होणारा ओला कचरा व सुका कचरा याची विल्हेवाट लावणारी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करायला हवी.
7) गावात सार्वजनिक स्वच्छता गृहे किती आहेत , कुठे आहेत , पुरुषांसाठी किती, स्त्रीयांना किती , यांचे नकाशे गावाच्या मुख्य ठिकाणी लावणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाचे लोक ते स्वच्छता गृहे किती स्वच्छ ठेवतात याकडे लक्ष असावे.खरं तर निसर्गाच्या सान्निध्यात राहिणारा प्रत्येक मुका प्राणी आपण केलेल्या विष्ठेमुळे दुसऱ्यांना बाधा होऊ नये म्हणून तो स्वतः आपल्या खुराने विष्ठा मुजवताना दिसतो.कारण त्याला ही वाटले आपल्या मुळे दुसऱ्याच्या आरोग्याला बाधा निर्माण होऊ नये.मग आपण तर तर बोलता चालता माणूस आहे.
8) जेव्हा गावचा बाजार असतो. तेव्हा जे व्यापारी गावात येतात. त्यांना एक आचारसंहिता निर्माण करून द्यावी.बाजार झाला की माझे गाव स्वच्छ दिसावे. यासाठी शिल्लक मटेरियल गावात , गावाच्या बाजारपेठेत न टाकता त्याची योग्य ती विल्हेवाट स्वतः व्यापाऱ्याने लावावी.
9) गावच्या विकासाच्या नावाखाली त्याच गटारी, त्याच ठिकाणी प्रत्येक वर्षी खोदून राज्याचा व देशाला पैसा खराब न करता त्यावर योग्य अशा उपाययोजना करण्यात याव्यात.
10) आरोग्य संपन्न गाव बनवायचे असेल तर प्रत्येक घरी स्वच्छतागृहे हवीत.शिवाय त्याचा वापर लोकांनी स्वतः हुन केला पाहिजे.
11) गावातील मुले म्हणजे माझ्या घरातील मुले समजून काम करणारी सच्च्या काळजाची मानसं निर्माण होणे गरजेचे आहे.
12) गावातील सार्वजनिक तालिम,जीम, व्यायाम शाळा,मुलांना खेळण्यासाठी मैदाने, गावातील वृध्द लोकांसाठी करमणूकीसाठी बगीचा आहे का ? याकडे लक्ष देणारे व ते सर्व ठिकाणे सुव्यवस्थेत ठेवण्याचे कार्य गावच्या कारभाऱ्याने करावे . त्याला गावातील सर्वांनी मोकळ्या मनांनी साथ द्यावी.कारण यातून तयार होणारी मुलं आपाल्याच घरातील,गावातील असतील.
13) गावातील आरोग्य व्यवस्थेने गावाचे आरोग्य व्यवस्थित व चांगले रहावे यासाठी काय काय उपाययोजना केल्या व जमिनीवर जाऊन किती काम केले याचा लेखाजोखा ग्रामसभेत देणे अनिवार्य करावे.तरच आरोग्य यंत्रणा गावातील सामान्य व्यक्तीच्या आरोग्य कडे लक्ष देईल.
14) गावातील व्यवसायिक, व्यापारी वर्गाने स्वतः ला शिस्त लावून गावात स्वच्छता कशी राहील याची स्वतः काळजी घ्यावी.
यामुळे माझं गाव, सुंदर गाव, स्वच्छ गाव , आरोग्य संपन्न गाव होईल . तेव्हा माझं घर , माझ्या घरातील कोणाचेच आरोग्य बिघडले जाणार नाही याकडे लोक लक्ष देतील.
त्यामुळे आर्थिक, मानसिक त्रास कमी होईल यात शंका नाही.
प्रा. आनंदा आलदर