तबला पखवाज यांच्या साथीने वातावरण भक्तिमय
पंढरपूर प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आयोजित नवरात्र संगीत महोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सर्व सदस्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या महोत्सवात दुसऱ्या दिवसाचे स्वर पुष्प किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पं. संजय गरुड व ख्यातनाम गायिका अपर्णा केळकर यांच्या अभंगवाणीने झाले.
सुरुवातीला सदस्या शकुंतला नडगिरे , लेखाधिकारी अनिल पाटील पं.संजय गरुड सौ.अपर्णा केळकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन झाले.
सर्व कलाकारांच्या सत्कारानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीला वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र जय जय राम कृष्ण हरी या मंत्राने वातावरण भक्तीमय झाले त्यानंतर पं. भीमसेन जोशी व पं. जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेल्या अभंग रचना त्यामध्ये रुप पाहता लोचनी,पंढरी निवासा सखा पांडुरंग, पद्मनाभा नारायणा,माझे माहेर पंढरी, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,भाग्यदा लक्ष्मी बारंम्मा, विष्णू मय जग,अवघे गर्जे पंढरपूर,असे एकापेक्षा एक सरस अभंगवाणीने अभंगांचा वर्षाव झाला,शेवटी अवघा रंग एक झाला व अगा वैकुंठीच्या राया या भैरवी ने कार्यक्रमांची सांगता झाली.
त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला रोहन शेटे कौशिक केळकर हार्मोनियम निनाद सोलापूरकर पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ शिवराज पंडीत यांनी केली,या नवरात्र संगीत महोत्सवाला पंढरपूरकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे,अशाच मोठ्या संख्येने दररोज उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सुवर्णालंकाराने रुप अधिकच मोहक दिसत असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे.