बारामती प्रतिनिधी तेज न्यूज
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या उजनी धरणाच्या पाणीपातळीत गेल्या १५ दिवसांत जवळपास १० टक्क्यांची घट झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने आणि धरणातून सातत्याने पाणी सोडले जात असल्याने पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल का, अशी भीती आतापासूनच व्यक्त केली जात आहे.गेल्या वर्षी ४ ऑक्टोबर रोजी उजनी धरण १०० टक्के भरले होते. मात्र यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यात पुरेशी वाढ झालेली नाही.
१९ सप्टेंबर रोजी धरणाची पाणीपातळी ९७.५७ टक्के होती, तर ४ ऑक्टोबर रोजी ती ८८.५२ टक्क्यांवर आली. म्हणजेच अवघ्या १५ दिवसांत सुमारे ९.०५ टक्क्यांची घट झाली आहे.
उजनीतून विविध योजनांसाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, टनलमधून ६५०, दहिगावमधून १०, सीना-माढा प्रकल्पासाठी २१० आणि मुख्य कालव्यातून २,६५० क्युसेक पाणी सोडले जात होते.
उन्हाची तीव्रता वाढत असताना सततचा विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.
उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असले तरी त्याचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र इंदापूर तालुक्यात आहे. सोलापूर महानगरपालिका, औद्योगिक वसाहती आणि विविध पाणीपुरवठा योजना उजनीवर अवलंबून आहेत. त्याचबरोबर इंदापूरमधील साखर कारखाने, गावांच्या पाणीपुरवठा योजना, कागद प्रकल्प आणि बारामती औद्योगिक वसाहतीलाही उजनीच्या पाण्याचा मोठा आधार आहे.
सोलापूरकडे सातत्याने पाणी सोडले जात असल्याने इंदापूरमधील पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. उजनीच्या पाण्याचे समन्यायी नियोजन आणि वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

