पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पावसाने मोठी दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके करपून गेली असून शेतजमिनींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांनी शुक्रवारी दुष्काळग्रस्त गावांचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
सकाळी वाजल्यापासून 9 वाजले पासून आमदार आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील ममदाबाद हुन्नूर, लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, हुन्नूर, तसेच ओढ्यालगतच्या शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी मका, बाजरी, कांदा, ऊस आणि तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जळून गेली असून शेतजमिनींमध्ये भेगा पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी शेतकऱ्यांनी आमदार आवताडे यांच्यासमोर पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटाची व्यथा मांडली. पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले, शेतकरी हा आपल्या मतदारसंघाचा कणा आहे. तो संकटात असताना त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. या भागातील परिस्थितीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी आणि कृषिमंत्र्यांना सादर करणार असून, तातडीने पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करणे आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात उपस्थित महसूल विभागाचे अधिकारी, कृषी सहाय्यक आणि तलाठ्यांना आमदार आवताडे यांनी तातडीने पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या पाहणी दौऱ्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष, स्थानिक सरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

