पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी "झाडू संतांचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग" या संतांच्या शिकवणीला प्रत्यक्ष कृतीत उतरवत पंढरपूर शहरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवली. या अभियानात इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत येथील नागरिकांना स्वच्छतेचा कृतीशील संदेश दिला.
पंढरपुरातील पवित्र चंद्रभागा तीरावरील प्रभूपाद घाट तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या इस्कॉन मंदिर परिसरात हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. विद्यार्थ्यांनी हातात झाडू आणि स्वच्छता साहित्य घेत संपूर्ण परिसरातील प्लास्टिक व कचरा दूर करून परिसर स्वच्छ केला. शालेय विद्यार्थ्यांचे हे श्रमदान पाहून स्थानिक नागरिक आणि भाविकांनीही त्यांचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी म्हणाले,"स्वच्छता निरोगी जीवनाचा पाया आहे. वैयक्तिक आरोग्याइतकेच सामाजिक परिसराची स्वच्छता राखणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. विद्यार्थ्यांनी शालेय वयातच स्वच्छतेचे महत्त्व ओळखून ते आचरणात आणल्यास एक सशक्त आणि निरोगी समाज घडण्यास मदत होईल."
यावेळी मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष स्वच्छता अभियान प्रभावीपणे कसे राबवावे, याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या सामाजिक उपक्रमात शाळेतील सर्व निवासी शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांसमवेत प्रत्यक्ष स्वच्छता कार्यात सहभागी होत श्रमदान केले.

