पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने ‘एक दिवस एक तास एकसाथ’ या उपक्रमांतर्गत भव्य सामूहिक श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भीमा नदी वाळवंट परिसरात नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणीताताई भगीरथ भालके यांच्या सहभागाने या स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी रोकडे व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसराची स्वच्छता केली. शहरातील विविध प्रमुख मार्ग, चौक व सार्वजनिक ठिकाणी एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या अभियानांतर्गत विणे गल्ली ते धोंडोपंतदादा मठ, न.पा. गॅरेज ते दगडी पूल रोड, महात्मा फुले चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर कमान, भूयाचा मारुती ते उपजिल्हा रुग्णालय कॉर्नर व उकळीकर बोळ, चंद्रभागा बस स्थानक सुलभ शौचालय ते सरगम चौक ते अकलूज नाका तसेच के.बी.पी. कॉलेज चौक ते चंद्रभागा स्थानक सुलभ शौचालय या परिसरांमध्ये स्वच्छता करण्यात आली.
पंढरपूर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने शहरातील स्वच्छता व सार्वजनिक परिसरांचे सुशोभीकरण याला विशेष महत्त्व आहे. या उपक्रमातून ‘स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी आहे’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे शहरातील स्वच्छता उपक्रमांना नवी ऊर्जा मिळाली. नागरिकांनीही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन भालके यांनी यावेळी केले .

