पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाला सोमवारी भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. परभणी येथील गायक कृष्णराज लवेकर आणि गायिका ज्योती गोराणे यांनी आपल्या सुरेल स्वरांतून सादर केलेले अभंग, गवळणी आणि भक्तिगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या दोन्ही कलाकारांच्या सुरेल गायनातून नवरात्र महोत्सवातील पहिली स्वरमाळ श्री रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आली.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव आणि व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, नगराध्यक्षा तथा समिती सदस्या डॉ. प्रणिती भालके, सदस्या शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश आणेचा आणि उपस्थित मान्यवर कलाकारांच्या हस्ते विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने उपस्थित कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
महोत्सवाच्या पहिल्या सत्रात परभणी येथील गायक कृष्णराज लवेकर यांनी आपल्या सुरेल, भावपूर्ण आणि भक्तिरसाने ओतप्रोत गायनाने कार्यक्रमात रंगत आणली. वारकरी संप्रदायाचा भक्तिमय बीजमंत्र असलेल्या ‘जय जय राम कृष्ण हरी’ या नामघोषाने त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यानंतर ‘रूप पाहता लोचनी’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘विठुराया माझा आनंदाचा कंद’, ‘देवा तुझा मी सोनार’ आणि ‘जातो माघारी पंढरीनाथा’ यांसारखे लोकप्रिय अभंग सादर करून त्यांनी विठ्ठलभक्तीचा सुरेल आविष्कार घडविला. त्यांच्या गायनातील भावपूर्णता, सुरांची सहजता आणि अभंगांमधील भक्तिभाव यामुळे उपस्थित रसिकांना अविस्मरणीय संगीतानुभव मिळाला.
दुसऱ्या सत्रात गायिका ज्योती गोराणे यांनी
आपल्या मधुर स्वरांनी संगीत मैफलीत भक्तिरसाची रंगत वाढविली. ‘जय जय राम कृष्ण हरी’ या नामघोषानंतर त्यांनी ‘अवचित परिमळू’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ आणि ‘पाहिला नंदाचा नंदन’ यांसह विविध अभंग आणि गवळणी सादर केल्या. भक्तिगीतांच्या सुमधुर सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन्ही सत्रांतील गायनाने नवरात्र महोत्सवाची सुरुवात सुरेल आणि भक्तिमय झाली.
या संगीत मैफलीला निवेदनाची साथ उमेश बागडे यांनी दिली. शाम गोराणे, सोहम गोराणे, अविनाश पवार, विश्वास कळमकर, सुधांशू धाबेकर, साई चाणक्य, गणेश ऐबेकर, शोभा कदम, विश्वेश्वर कोळंबीकर, मंगेश जवळेकर आणि हरिप्रसाद पांडे यांनी विविध वाद्यांच्या माध्यमातून सुरेल साथसंगत केली. त्यांच्या संगीतसाथीमुळे दोन्ही कलाकारांच्या गायनाला अधिक उठाव मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले.
श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत, भक्तिगीते, अभंग आणि वारकरी संगीतपरंपरेचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. पुढील सात दिवस महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आणि गायिका आपल्या गायनसेवेने विठुरायाच्या चरणी स्वरांची सेवा अर्पण करणार आहेत. या संगीत महोत्सवाचा लाभ पंढरपूरकरांसह भाविक आणि संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

